Formula Four Race Track Cost Increases Exceeds 40 Crore
फॉर्म्युला फोर ट्रॅकचा खर्च पोहोचला ४० कोटींवर
Contributed by: नवी मुंबई,म. टा. वृत्तसेवा|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवी मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या फॉर्म्युला फोर कार रेससाठी ट्रॅक विकसित करण्याचा खर्च ३१.९३ कोटी रुपयांवरून ३९.८३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या कामासाठी आणखी ७ कोटी ८९ लाख ६७ हजार ७३५ रुपयांच्या वाढीव खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांऐवजी कार रेससाठी होणाऱ्या खर्चावर पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
फेब्रुवारीमध्ये ट्रॅक विकसित करण्यासाठी ३१ कोटी ९३ लाख ६० हजार २४४ रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, आता त्यात सुमारे ७.८९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे या कामाचा एकूण खर्च ३९ कोटी ८३ लाख २६ हजार ९६९ रुपयांवर गेला आहे. केवळ रेसचा ट्रॅक उभारण्यासाठी एवढा मोठा खर्च करण्याच्या निर्णयावर यापूर्वीही आक्षेप घेण्यात आले होते. त्यात आता वाढीव खर्चाची भर पडली आहे.शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या वाढीव खर्चाचा मुद्दा उपस्थित झाला. शिवसेनेच्या नगरसेविका आणि समिती सदस्य सरोज पाटील यांनी खर्चवाढीबाबत प्रशासनाकडून खुलासा मागितला. ट्रॅकच्या कामासाठी एवढा अतिरिक्त खर्च का करावा लागत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर अतिरिक्त शहर अभियंता मदन वाकचौरे यांनी बांधकाम करताना प्रत्यक्ष कामाच्या प्रमाणात कमी-अधिक बदल होत असल्याने खर्चात वाढ झाल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, या खुलाशानंतरही खर्चवाढीचा मुद्दा चर्चेत राहिला. अखेर स्थायी समितीने वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
एकीकडे शहरातील पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढत असताना, दुसरीकडे फॉर्म्युला फोर रेसच्या ट्रॅकसाठी वाढत जाणारा खर्च चर्चेचा विषय ठरत आहे. या खर्चातून शहराला नेमका किती लाभ होणार, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.