बिबट्याच्या हल्ल्यात महिला मजुराचा मृत्यू

Contributed by: पालघर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
बिबट्याच्या हल्ल्यात महिला मजुराचा मृत्यू
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ७६ वर्षीय महिला मजुराचा मृत्यू झाला. माटगाव येथे रविवारी (१ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वावर वाढत असताना, ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, तलासरी तालुक्यातील दर्जिपाडा येथे सोमवारी पहाटे बिबट्याने गोठ्यात शिरून वासराची शिकार केली.

डहाणू तालुक्यातील माटगाव येथील बळवंत राऊत यांच्या वाडीजवळून तुळशी रामा सावर ही महिला रविवारी सायंकाळी माटगाव थांब्यापासून मुख्य रस्त्याने जात होती. त्यावेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बोईसर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि वाणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पंचनामा करताना मृत महिलेच्या शरीरावर बिबट्याच्या हल्ल्यामुळे झालेल्या जखमा आणि नखांचे ओरखडे आढळले. घटनास्थळावरून आवश्यक पुरावे आणि छायाचित्रे संकलित करण्यात आली. वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी मृतदेह तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डहाणूचे उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघरचे सहाय्यक वनसंरक्षक रामानुज बांगड आणि बोईसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पिंपळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

बोईसर वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांमार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. मृत महिलेच्या नातेवाइकांना तातडीची मदत म्हणून २० हजार रुपये देण्यात आले असून, मृतदेह मूळ गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पिंपळे यांनी दिली.