मुंबई : कलिंगड लालबुंद दिसतेय, म्हणजे ते गोड आणि दर्जेदार असेलच, याची खात्री नाही! फळांचा रंग, गोडवा आणि पिकण्याची प्रक्रिया बदलण्यासाठी काही विक्रेत्यांकडून रसायने, रंगद्रव्ये किंवा साखरेचे पाणी वापरले जात असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, फळ कापल्याशिवाय किंवा चाखल्याशिवाय त्यातील संभाव्य भेसळ ओळखण्याचा मार्ग आता खुला होणार आहे. सोमय्या विद्याविहार विद्यापीठातील प्राध्यापकांनी विकसित केलेल्या कमी खर्चाच्या उपकरणाच्या मदतीने कलिंगडाचे स्कॅनिंग करून त्याचा दर्जा तपासता येणार आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान फळविक्रेत्यांच्या हातात पोहोचल्यास ग्राहकांना फळांच्या गुणवत्तेबाबत अधिक खात्री मिळू शकणार आहे.सुमारे एक लाख रुपये खर्चाच्या या नमुना उपकरणात कलिंगड एका फिरत्या मंचावर ठेवले जाते. बंदिस्त कक्षात सामान्य कॅमेरा आणि उष्णता टिपणारा कॅमेरा फळाच्या सर्व बाजूंचे निरीक्षण करतात. संशोधनादरम्यान कलिंगडावर साखरेचे पाणी, लाल रंगद्रव्य किंवा पिकवणारे घटक लावलेल्या भागांमध्ये तापमानातील फरक दिसून आला. उष्णता टिपणाऱ्या प्रतिमांमध्ये हे भाग तुलनेने थंड दिसले. याउलट, निरोगी कलिंगडाच्या तापमानात सर्व बाजूंनी एकसमानता आढळली. त्यामुळे तापमानातील बदलांच्या आधारे फळाची गुणवत्ता तपासण्याची शक्यता अधोरेखित झाली आहे.
या संशोधनात प्रा. डॉ. निनाद मेहेंदळे यांच्यासह डॉ. क्रांती जमदाडे (केजेएसआयएम), डॉ. नीलम नाईक (यूपीजीसीएएससी), डॉ. धनम्मा जगळी आणि डॉ. सीमा पुरोहित यांचा सहभाग आहे. ‘ फळांची गुणवत्ता तपासण्यासाठी ती कापण्याची गरज भासू नये, हा या संशोधनामागील उद्देश आहे. सध्या पेटंट दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, उपकरणाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यानंतर ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल,’ असा विश्वास डॉ. मेहेंदळे यांनी व्यक्त केला.
हातात मावणारे उपकरण विकसित करण्याचे लक्ष्य
या संशोधनासाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून ‘पूर्ण स्वयंचलित फळ प्रतवारी आणि गुणवत्ता विश्लेषक’ आणि ‘सौरऊर्जेवर चालणारा फळ प्रतवारी यंत्र’ या दोन डिझाइनची नोंदणी झाली आहे. संशोधनावर दोन शोधनिबंधही लिहिण्यात आले आहेत. सध्या हा संशोधनाचा पहिला टप्पा असून, पुढील काळात अधिक फळांवर चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर फळविक्रेत्यांना रोजच्या वापरासाठी सहज हाताळता येईल, असे कमी खर्चाचे, हातात धरता येणारे उपकरण विकसित करण्याचे आमचे लक्ष्य असल्याची माहितीही प्रा. डॉ. मेहेंदळे यांनी दिली.