Unauthorized Slum Dwellings In Bengali Pura Pose Risk To Railway Safety
बंगालीपुऱ्याला वेढा
Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
उपनगरी रेल्वे रुळांच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या अनधिकृत झोपड्यांचा विळखा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. वांद्रे येथील गरीब नगरमधील ४०० अनधिकृत झोपड्यांवर पश्चिम रेल्वेने हातोडा चालवला, तर कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावरील तीन हजारांहून अधिक झोपड्यांना मध्य रेल्वेने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, वडाळा पूर्वेकडील बंगालीपुरा परिसरात हार्बर मार्गाच्या रुळांलगत वसलेल्या शेकडो झोपड्यांकडे रेल्वेचे दुर्लक्ष आहे. अन्य ठिकाणी अतिक्रमण हटवण्यासाठी पुढाकार घेणारे रेल्वे प्रशासन बंगालीपुरातील अनधिकृत झोपड्या कधी हटवणार?, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित होत आहे.
हार्बर मार्गावरील वडाळा ते किंग्ज सर्कलदरम्यान रेल्वे रुळांच्या अगदी जवळ वसलेल्या शेकडो अनधिकृत झोपड्या आहेत. वडाळा ते किंग्ज सर्कलदरम्यान दोन्ही बाजूंनी लोकल गाड्यांची वाहतूक सुरू आहे. या दोन रेल्वेगाड्यांच्या मध्ये अनधिकृत झोपड्या वसल्या आहेत. हा संपूर्ण परिसर बंगालीपुरा म्हणून ओळखला जातो. अनधिकृत झोपड्यांना वीज आणि पाणीजोडणी आहे. दोन रेल्वे रुळांच्या मध्ये असलेल्या या झोपड्यांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकल गाड्यांच्या वेगवान वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे रुळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.रेल्वेच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमणांचा प्रश्न केवळ जागेच्या मालकीपुरता मर्यादित नाही. रेल्वेच्या सुरक्षिततेशी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाबाबतही तो निगडित आहे. एका मार्गावर अतिक्रमण हटवण्याची मोहीम आणि दुसऱ्या मार्गावर मात्र कारवाईबाबत अनिश्चितता, अशी स्थिती कायम राहिल्यास रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील हजारो अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरू असताना मध्य रेल्वेने सर्वच रेल्वे जमिनींवरील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करावी; वडाळा पूर्वेकडील बंगालीपुरा परिसरासह रेल्वेच्या सर्व जागांवरील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून नियमानुसार कारवाईची स्पष्ट कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.