बॅडमिंटन स्पर्धेत खेळाडूंची कामगिरी

Contributed by: छत्रपती संभाजीनगर,म.‌ टा.‌ प्रतानिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
champions of chhatrapati sambhajinagar shine in badminton tournament
अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. प्रथमेश कुलकर्णी बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंनी भरीव कामगिरी केली.

स्पर्धेत अकादमीच्या चार खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. स्पर्धेत डॉ. विद्यानंद देशपांडे यांनी दुहेरी विजेतेपद पटकावले. त्यांनी पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरी अशा दोन्ही गटांत विजेतेपद मिळवले. तसेच मिश्र दुहेरी गटात उपविजेतेपद पटकावत एकाच स्पर्धेत तीन पदके मिळवली. डॉ. रेणुका देशपांडे आणि डॉ. मृग्या यांनी मिश्र दुहेरी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत या डॉक्टर खेळाडूंनी बॅडमिंटन खेळासाठी वेळ देऊन राज्यस्तरावर यश मिळवले. या उल्लेखनीय यशाबद्दल प्रथमेश कुलकर्णी यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.