स्लॅब हटविण्याचे काम थांबले?

Contributed by: म. टा. वृत्तसेवा,त्र्यंबकेश्वर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
स्लॅब हटविण्याचे काम थांबले?
अनेक वर्षांपासून पर्यावरणप्रेमींची मागणी असलेला मेनरोड आणि परिसरातील गोदावरी नदीपात्र बंदिस्त करणारा सिमेंट काँक्रीट स्लॅब सिंहस्थ कामांच्या नियोजनात तोडण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र मंदिरापासून जवळच असलेल्या लक्ष्मीनारायण चौकात सुरू असलेले काम व्यावसायिकांच्या मागणीवरून नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी थांबवले, तर गायत्री मंदिराजवळ स्लॅब काढण्यास झालेली सुरुवात काही फूट तोडफोड करत थांबली आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी हे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने थांबवल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

गोदावरी नदीपात्र बंदीस्त केल्याने सूर्यकिरण तेथे पोहचत नाहीत. त्यामुळे येथून वाहणारे पाणी आरोग्याला घातक झाले आहे. तसेच नदीपात्रात काँक्रीट टाकले आहे. साहजिकच नदीपात्रातील जिवंत स्त्रोत मृत झाले आहेत. केवळ पावसाळयात डोंगरावरून वाहणारे ओहळ आणि रस्त्यावरून वाहणारे पाणी यांचा प्रवाह असतो. इतरवेळेला सांडपाणी असते. गोदावरी नदीपात्राला बंदीस्त करणारा सिमेंट काँक्रीटचा स्लॅब तोडण्याचे काम वेळोवेळी रोखले तर अनेक वर्षांपासून कोंडलेला गोदावरीचा श्वास मोकळा कसा होणार? असा प्रश्न शहरातील पर्यावरणाच्या समस्यांबाबत सजगता बाळगणाऱ्या नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
तोडलेल्या स्लॅबने व्यवस्थेने लपवलेले सत्य उघड झाले आहे. नदीपात्रातून वाहणारे सांडपाणी आणि नागरिकांनी घरातील शौचालय व स्नानगृहाचे सांडपाणी सोडल्याचे निदर्शनास येत आहे. मेनरोडचा स्लॅब ७० वर्षांपूर्वी, तर गायत्री मंदिराकडचा स्लॅब ४० वर्षांपूर्वी टाकलेला आहे. अलीकडच्या २० वर्षांत गोदावरीत सांडपाणी नको अशी चळवळ सुरू झाली. दरम्यानच्या कालावधीत हरित लवादाकडे दावे दाखल झाले, मात्र परिस्थिती बदलली नाही. त्र्यंबकेश्वरचे सांडपाणी थेट गौतमी बेझे धरणात आणि तेथून गंगापूर धरणात पोहाचते. सिंहस्थ २०१५ मध्ये गौतमी बेझे धरणाचे पाणी येथे पिण्यासाठी आणले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असा मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्र्यंबकेश्वर येथील लोकसंख्या १५ हजार आणि दररोज गावात येणारे भाविक ३५ हजार असे दररोज ५० हजार लोकांच्या मलमूत्राचा विसर्ग होत असतो. त्यात यात्रा कालावधीत याचे प्रमाण वाढते. त्यामुळे गौतमी बेझे धरणाचे पाणी परिसरातील गावांचा पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यास विरोध आहे. मात्र त्र्यंबकेश्वर येथे ते बिनबोभाट वापरले जाते. तसेच गत सिंहस्थात बांधलेल्या नदी घाटावर याच सांडपाण्याच्या प्रवाहात भाविकांना स्नान घालण्यात आले. याबाबतची वस्तुस्थिती माहीत झाल्याने बहुतांश भाविकांनी घाटावर स्नान करण्यास नकार दिला होता.