नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित

Contributed by: धुळे,म. टा. वृत्तसेवा|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नऊ आस्थापनांचे परवाने निलंबित
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यातील मिठाई व नमकीन विक्री करणाऱ्या आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम राबवली. १ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत केलेल्या कारवाईत भेसळयुक्त व मिथ्याछाप असल्याचा संशय असलेला २६ लाख ४१ हजार ९९ रुपये किमतीचा एकूण ३ हजार ४८० किलो माल जप्त करण्यात आला आहे.

दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील एकूण ६७ पेढ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३१ पेढ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, नऊ पेढ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच आठ पेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, तपासणीसाठी एकूण ८२ नमुने घेण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या साठ्यांमध्ये प्रामुख्याने मसाले, खाद्यतेल, नमकीन आणि मिठाईचा समावेश आहे.
या पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार संबंधितांवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई नंदुरबार कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सपना गोडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी तुषार देवरे, सुरेंद्र डौले आणि संकेत सदाफुले यांनी पार पाडली.