सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकासाच्या कोट्यवधींच्या प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी मिळत असताना, ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ या दोन महत्त्वाच्या विमानतळांना जोडणाऱ्या २१० कोटींच्या रस्त्याचा प्रस्ताव मात्र अद्याप प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांच्या मतदारसंघांतून जातो. दुसरीकडे कुंभमेळ्याशी थेट संबंध नसलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्त्यांना कोट्यवधींच्या मंजुरी मिळत असल्याने ओझर-शिर्डी मार्गाला मंजुरी देण्याबाबत शासनाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महायुतीतील राष्ट्रवादीच्या आमदारांची विकासकामांसाठी कोंडी होत असल्याची चर्चा यानिमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे.
ओझर विमानतळ ते शिर्डी विमानतळ हा सुमारे २१० कोटी रुपये खर्चाचा आणि १० मीटर रुंदीचा प्रस्तावित मार्ग निफाडचे आमदार दिलीप बनकर, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या मतदारसंघांतून जाणार आहे. तीन मतदारसंघांतील दळणवळण, औद्योगिक विकास आणि ग्रामीण वाहतुकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात शिर्डी तसेच मराठवाडा आणि विदर्भातून नाशिककडे येणाऱ्या भाविकांसाठीही हा पर्यायी मार्ग उपयुक्त ठरू शकतो. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही.दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील रामा-६६ ते शनी शिंगणापूर ते कांगोनी, सोनई - घोडेगाव - कुकाणा, सोनई - कांगोनी ते अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर आणि कांगोनी - खरवंडी तसेच खरवंडी - वडाळा बहिरोबा या रस्त्यांसाठी एकूण ५८.६० कोटी रुपयांच्या स्वतंत्र प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. तसेच चांदवड - लासलगाव रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणेसाठी ७५.८२ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. चांदवड मतदारसंघात भाजपचे आमदार राहुल आहेर आहेत. विशेष म्हणजे, मंजुरी मिळालेल्या या रस्त्यांचा सिंहस्थ कुंभमेळ्याशी थेट संबंध दिसून येत नसताना कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ओझर - शिर्डी मार्गाचा प्रस्ताव रखडल्याने निधीवाटपाच्या निकषांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची चर्चाही यापूर्वी झाली होती.