‘फार्म हाऊस स्वत:च्या जागेत’

Contributed by: म.टा. वृत्तसेवा,नवी मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
suraj samats clarification on farm house encroachment
मोरबे धरणाच्या बुडित क्षेत्रात अतिक्रमण करून ‘मे. सामत फार्म’ उभारण्यात आल्याचा नवी मुंबई महापालिकेचा दावा सूरज सामत यांनी खोडून काढला आहे. ‘मे. सामत फार्म’ हा नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणाच्या बुडित क्षेत्रात उभारण्यात आला नसून, तो बोरगांव खुर्दमधील सर्व्हे नं. १४/२ मधील आमच्या ताब्यात, वहिवाटीत असलेल्या जागेत उभारण्यात आला असल्याचे सूरज यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई महानगरपालिकेने ‘मे. सामत फार्म’ला बजावलेल्या नोटिशीच्या अनुषंगाने ‘मटा’मध्ये गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत सूरज यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘मे. सामत फार्म ’ हा मोरबे धरणाच्या बुडीत क्षेत्रात नव्हे, तर लगतच्या जागेत उभारण्यात आल्याचा दावा करताना सूरज सामत यांनी सर्व्हे नं. १४/२चा सातबारा उतारा, सदर जागेचे मोजणी नकाशे व अन्य शासकीय कागदपत्रे ‘मटा’कडे सादर केली. सदर फार्मचे बांधकाम करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत बोरगांव खुर्द यांचे ‘ना हरकत पत्र’ही त्यांनी जोडले आहे.
‘संयुक्त मोजणी झाली तेव्हा धरणाकडील प्रतिनिधींनी मोजणीच्या नोंदीवर सहमती दर्शवून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे त्याच हद्दीबाबत आक्षेप घेणाऱ्या नोटिसा महापालिकेकडून येत असल्याबद्दल सामत यांनी आश्चर्य व्यक्त केले.

फार्महाऊसच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेली संरक्षक भिंत, सर्व्हे नं. १४/२ मधील आमच्या ताब्यातील व वहिवाटीतील जागेत उभारण्यात आली आहे, असेही सामत यांनी म्हटले आहे.

नवी मुंबई महापालिकेने आत्तापर्यंत बजावलेल्या चार नोटिशींना आम्ही वेळोवेळी कागदपत्रांसह उत्तर दिल्याचे सूरज सामत यांचे म्हणणे आहे. पूर्वीच्या मोजणीतील हद्द आणि आज करण्यात येणारा अतिक्रमणाचा आरोप त्यातील नेमका फरक कोणता, हे महापालिकेने मूळ अभिलेखाच्या आधारे स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.