Victory Of Mejvani In Womens Theatre Festival A Showcase Of Artistic Talent
महिला नाट्य स्पर्धेत ‘मेजवानी’ विजेते
Contributed by: छत्रपती संभाजीनगर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कामगार कल्याण मंडळाच्या महिला नाट्य महोत्सवात जालना येथील कामगार कल्याण केंद्राच्या ‘मेजवानी’ एकांकिकेने पहिले पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत तेरा संघांनी वैविध्यपूर्ण एकांकिका सादर करीत रसिकांची दाद मिळवली.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने महिला नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात मराठवाड्यातील तेरा संघांनी सहभाग घेतला होता. ललित कला भवन येथे सोमवारी पारितोषिक वितरण करण्यात आले. या वेळी रंगकर्मी सतीश बोरा, वरिष्ठ मानव संसाधन व्यवस्थापक लक्ष्मण यमगर, गुणवंत कामगार त्रिवेणी कांबळे, परीक्षक प्रा. रामेश्वर झिंजुर्डे, प्रा. विशाखा शिरवाडकर व रमेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. परीक्षकांनी सहभागी संघांच्या अभिनय, दिग्दर्शन व सादरीकरणाची चिकित्सा करीत कलावंतांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नाट्यकर्मी सतीश बोरा यांनी कलावंतांना अभिनयातील बारकावे, संवादफेक, रंगमंचावरील आत्मविश्वास आणि नाट्यकलेतील सातत्याबाबत मार्गदर्शन केले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कामगार कल्याण केंद्र, जालना यांच्या ‘मेजवानी’ एकांकिकेने पहिला क्रमांक पटकावला. कामगार कल्याण केंद्र, छावणी यांच्या ‘मार्सिया’ आणि कामगार कल्याण केंद्र, बजाजनगर यांच्या ‘वागार्थ’ एकांकिकेने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. प्रियदर्शिनी कॉलनी केंद्राच्या ‘वामांगी’ आणि कामगार कल्याण केंद्र, शिवाजीनगर यांच्या ‘मुक्ता झालीसे मुक्ताई’ या एकांकिकांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पहिले पारितोषिक सई जोशी यांनी पटकावले. समीक्षा सराफ आणि सुकृती काकडे यांना दुसरे आणि तिसरे पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पहिले पारितोषिक वर्षाराणी कोळवले यांना ‘मेजवानी’साठी मिळाले. यज्ञदा जोशी आणि वैशाली धामणगावकर यांना दुसरे आणि तिसरे पारितोषिक मिळाले. सहायक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. महिला नाट्य महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. कामगार कुटुंबातील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या मंडळाच्या उपक्रमाचे महत्त्व सांगितले. जालन्याचे केंद्र संचालक जिज्ञेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले आणि कल्याण निरीक्षक विजय अहिरे यांनी आभार मानले. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.