कंत्राटी कामगारांचे बेमुदत उपोषण

महाराष्ट्र टाइम्स

महापालिकेतील कंत्राटी कामगारांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कंत्राटदारांकडून होणारे शोषण आणि प्रशासनाचा चालढकलपणा याविरोधात हे आंदोलन आहे. प्रविण ओव्हाळ, शैलेश पगारे आणि स्वप्नील पाटील उपोषणाला बसले आहेत. दहा वर्षांपासून किमान वेतनाच्या फरकाची रक्कम मिळालेली नाही. आयुक्तांनी दिलेले आश्वासन पाळले गेले नाही. त्यामुळे कामगारांनी हे पाऊल उचलले आहे.

कंत्राटी कामगारांचे बेमुदत उपोषण
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

विविध कारणांनी कंत्राटदारांकडून होणारे शोषण आणि महापालिका प्रशासनाच्या चालढकलपणाच्या निषेधार्थ महापालिकेतील कंत्राटी कामगार ांनी श्रमिक जनता संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. प्रविण ओव्हाळ, शैलेश पगारे आणि स्वप्नील पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. एकीकडे महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना कंत्राटी कामगार मात्र त्यांच्या न्याय मागण्यांसाठी लढा देत आहेत.

महापालिकेकडे गेली दहा वर्षे वारंवार पाठपुरावा करूनही कामगारांना किमान वेतनाच्या फरकाची रक्कम देण्यात आलेली नाही. २ जून रोजी महापालिका आयुक्तांनी आठ दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन श्रमिक जनता संघ युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांना दिले होते. मात्र कार्यवाही करण्यात आली नाही. त्यानंतर १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान कामगारांनी उपोषण केले. तेव्हाही महापालिका आयुक्तांनी संघटनेचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांच्या उपस्थितीत ऑक्टोबर अखेरपर्यंत संबंधित सर्व महापालिका अधिकाऱ्यांबरोबर सल्लामसलत करून थकबाकी देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. पण त्यानंतरही कामगारांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे हे उपोषण सुरू केले आहे.