ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठ संघाने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ मुलींच्या हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भोपाळच्या रवींद्रनाथ टागोर विद्यापीठाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळवला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हॉकी मैदानावर झालेल्या अखेरच्या सुपर-फोर साखळी सामन्यामध्ये ग्वाल्हेर संघाने भोपाळ संघाचा २-१ असा, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाचा १-० असा आणि महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ,अजमेर संघाचा ९-१ असा सहज पराभव करून अपराजित राहून अव्वल क्रमांक मिळवला. भोपाळ संघाने अजमेर संघाचा ८-१ असा पराभव केला. भोपाळ संघाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाचा ३-१ असा पराभव करून उपविजेतेपद मिळवले. पुणे विद्यापीठाने अजमेर संघावर ४-१ने मात केली.
पुणे विद्यापीठाच्या तनुश्री कडला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून, तर सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक म्हणून रूशी जाधवला गौरविण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण खडकी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रा. संजय चाकणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.






