उपनगरमध्ये सर्वाधिक इच्छुक

महाराष्ट्र टाइम्स

नाशिक महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पोलिसांनी १७२४ इच्छुकांची चारित्र्य पडताळणी पूर्ण केली आहे. उपनगर पोलिसांच्या हद्दीतून सर्वाधिक इच्छुक असल्याचे समोर आले आहे. सर्व इच्छुकांना प्रमाणपत्रे दिली आहेत. गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रात तशी नोंद केली आहे. अर्ज सादर करण्याची मुदत संपली असून, आता पुढील प्रक्रिया सुरू आहे.

highest applicants in character verification for nashik municipal election from suburban area

नाशिक महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगलेली असताना नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने सतराशे जणांची चारित्र्य पडताळणी पूर्ण केली आहे. १,७२४ जणांनी निवडणुकीत अर्ज नोंदविण्यापूर्वी चारित्र्य पडताळणी करून घेतली आहे. त्यामध्ये उपनगर पोलिसांच्या हद्दीतून सर्वाधिक इच्छुक असल्याचे समोर आले आहे. सर्व इच्छुक उमेदवारांना प्रमाणपत्र दिले असून, गुन्हे नोंद असणाऱ्यांच्या प्रमाणपत्रात त्यासंदर्भात नोंद करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष ांसह अपक्ष स्वरूपात अनेकजण इच्छुक आहेत. अर्ज नोंदणीची मुदत संपली असून, भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, मनसे यांसह इतर राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांनी तत्पूर्वी पोलिस आयुक्तालयामार्फत चारित्र्य पडताळणी केली आहे. इच्छुक उमेदवारांनी चारित्र्य पडताळणीसाठी ई-स्वरूपात अर्ज नोंदवले होते. हे अर्ज पोलिस ठाण्यांकडून तपासल्यानंतर विशेष शाखेत अंतिम पडताळणीसाठी प्राप्त झाले. तेथे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या ई-स्वाक्षरीसह चारित्र्य प्रमाणपत्र देण्यात आले आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांची जमवाजमव करून अर्ज सादर केले आहेत. पोलिसांमार्फत प्राप्त होणाऱ्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासह महापालिका कार्यालयातील निवडणूक शाखेत इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. आता पुढील टप्प्यात संबंधितांचे अर्ज मंजूर झाल्यानंतर इच्छुकांवरील गुन्हे व इतर कायदेशीर कारवाईंची माहिती स्पष्ट होईल.

उपनगरमध्ये सर्वाधिक इच्छुक