४२ हजार देशी वृक्षांची लागवड

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
42000 native trees planted at deolali dump yard a new vision
वर्षानुवर्षे प्लास्टिक, घरगुती कचरा आणि साचलेल्या घाणीच्या थरांनी देवळालीच्या कचरा डेपोचा परिसराचा श्वास गुदमरला होता. त्याचा परिणाम भूजल आणि जवळच्या जलप्रवाहांवर होत होता. एकेकाळी हिरवाईने नटलेल्या भूमीचा हा तुकडा जणू आपला श्वास हरवून बसला होता. मात्र सुनीता देशमुख, करुणा पगारे आणि सुचिता पाटील या तीन महिलांच्या पुढाकारातून या ठिकाणी हिरवीगार वनराई फुलवली आहे.

कचरा डेपोची ही अवस्था दूर करण्यासाठी वनरक्षक सुनीता देशमुख यांनी सीईओ अभिषेक त्रिपाठी आणि सचिन ठाकरे यांची भेट घेऊन कचऱ्याच्या ढिगाचे वनराईत रुपांतर करण्याची आपली कल्पना मांडली व या निसर्ग संवर्धनाच्या कामास सुरुवात केली. कचऱ्याचा ढीग असलेल्या जमिनीचे रुपांतर लागवडीयोग्य क्षेत्रात करण्यात आले. वर्षानुवर्षे साचलेला कचरा हटविण्यात आला. प्लास्टिक आणि घरगुती कचऱ्याचे थर उपसून त्याची योग्य घनकचरा व्यवस्थापन केंद्राकडे विल्हेवाट लावण्यात आली. जमिनीचे तब्बल एक मीटर खोलीपर्यंत उत्खनन करून, सेंद्रिय शेणखत, भाताची तूस आणि दर्जेदार कंपोस्ट मिसळून मातीची मशागत करण्यात आली. त्यानंतर सुमारे १.४० हेक्टर क्षेत्रफळाच्या दोन भूखंडांवर जपानी ‘मियावाकी’ पद्धतीने वृक्षलागवड करण्यात आली.