Experience Toll Discount Through Highway Journey App
टोलसवलतीचा ‘राजमार्ग’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
स्वतःच्या किंवा भाड्याने घेतलेल्या वाहनातून भारतभ्रमंती करणे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, इंधनखर्च आणि टोलचा वाढता भार यांमुळे एकूण खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. केंद्र सरकारच्या ‘राजमार्ग यात्रा’ ॲपच्या माध्यमातून हा प्रवास आता तुलनेने किफायतशीर ठरत आहे. वार्षिक राजमार्ग पास घेतल्यास, राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर वर्षभरात २०० टोल फेऱ्यांपर्यंत सवलत मिळते. त्यामुळे नियमित महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून या पासला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास सुरळीत व्हावा, तसेच महामार्गांची नियमित देखभाल व दुरुस्ती करता यावी, यासाठी या मार्गांवरून धावणाऱ्या वाहनांकडून टोल आकारला जातो. बहुतांश राष्ट्रीय महामार्गांवर टोल द्यावा लागत असल्याने प्रवासाचा खर्च वाढतो. वाहतूककोंडी कमी करण्यासाठी अनेक वाहनांवर फास्टॅग बसविण्यात आले आहेत. मात्र, फास्टॅग स्कॅन होताच वाहनचालकाच्या खात्यातून टोलची रक्कम थेट कापली जाते. त्यामुळे वेळ वाचत असला, तरी आर्थिक बचत मर्यादित राहते. याच पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत ‘राजमार्ग यात्रा’ ॲप सुरू करण्यात आले आहे. याद्वारे ३,०५० रुपये भरून वार्षिक राजमार्ग पास घेता येतो.