Extra Pressure On Teachers Impact Of Non educational Tasks On Teaching
‘मग शिकवणार कधी?’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘या कामांसाठी
स्वतंत्र यंत्रणा हवी’शाळांमध्ये ‘ माता पालक मेळावे ’ घेण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचनेवरून आता शिक्षक ांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. शिक्षक आधीच एसआयआर, जनगणना, विविध शासकीय उपक्रम, ऑनलाइन माहिती भरणे अशा अशैक्षणिक कामांमध्ये गुंतलेले असताना त्यात पुन्हा माता पालक मेळाव्यांची भर पडली आहे. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष प्रत्यक्ष अध्यापनाऐवजी विविध उपक्रम आणि अशैक्षणिक कामांमध्येच जात असल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘प. बा. सामंत शिक्षणसूत्री प्रयास’ या संस्थेने शिक्षण आयुक्तांना पत्र पाठवून शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ देण्याची मागणी केली आहे.
शिक्षण आयुक्तालयाने २७ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘माता पालक शैक्षणिक मेळावा’ आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. एनईपी, निपुण भारत अभियान आणि इतर उपक्रमांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालकांमध्ये संवाद व समन्वय वाढविणे हा या मेळाव्यांचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक प्रगती, अभ्यासातील अडचणी, आरोग्य, वाचनाची सवय, पालकांचा सहभाग अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या उपक्रमामागील उद्देश चांगला असला तरी शिक्षकांच्या सध्याच्या कामाच्या व्यापाचा विचार करण्यात आलेला नाही, अशी भूमिका ‘प. बा. सामंत शिक्षणसूत्री प्रयास’ संस्थेचे अध्यक्ष गिरीश सामंत यांनी मांडली आहे. शाळांमध्ये विविध शासकीय उपक्रमांची अंमलबजावणी, माहिती संकलन, नोंदी अद्ययावत करणे, विविध सर्वेक्षणे आणि इतर कामांमुळे शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ कमी होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यातच वारंवार नवीन उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या जात असल्याने शिक्षकांवर अतिरिक्त ताण येत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
‘या कामांसाठी
स्वतंत्र यंत्रणा हवी’
संस्थेने शिक्षण आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांवर थेट बोट ठेवले आहे. मागील काही काळापासून शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामे दिली जात असल्याने प्रत्यक्ष अध्यापन आणि विद्यार्थ्यांशी संवादासाठी वेळ कमी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०२६-२७ या वर्षात जून ते ऑगस्ट या कालावधीत बहुतांश शिक्षक एसआयआर कामांमध्ये व्यग्र आहेत. फेब्रुवारी महिन्यात जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्यामुळे हे वर्ष शैक्षणिक वर्षाऐवजी अशैक्षणिक वर्ष ठरेल, अशी तीव्र भावना पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. जनगणनेसारख्या कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध करून शिक्षकांना त्यातून वगळावे, प्रत्येक उपक्रमासाठी छायाचित्रे आणि अहवाल अपलोड करण्याची पद्धत बंद करावी, शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांना शिक्षण विभागाच्या नियमांनुसार मर्यादा घालावी, अशा काही प्रमुख मागण्याही या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.