विज्ञानाधारित पुस्तकांची संख्या वाढली पाहिजे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
विज्ञानाधारित पुस्तकांची संख्या वाढली पाहिजे
‘मराठी भाषा अधिक समृद्ध आणि व्यापक व्हायची असेल, तर विज्ञान विश्वातील दुर्लक्षित व अल्पपरिचित विषयांवर मराठीत दर्जेदार पुस्तके यायला हवीत. बुरशी आणि कवकांसारखे विषय जनसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत आणि उत्तम प्रकाशचित्रांसह पोहोचल्यास विज्ञानाची आवड अधिक वाढेल,’असे मत ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक आणि लेखक डॉ. प्र. के. घाणेकर यांनी व्यक्त केले.

प्रसिद्ध बुरशीतज्ज्ञ डॉ. किरण रणदिवे लिखित ‘बुरशी वैभव’ या बुरशी व कवकविषयक पुस्तकाचे प्रकाशन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच पुण्यात संपन्न झाले. सारथी संस्थेच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला लेखक डॉ. किरण रणदिवे, प्रा. डॉ. शरद पेंडसे, अभिनेते सुयश टिळक, ज्येष्ठ बुरशी अभ्यासक डॉ. विजय रानडे, मेधा रानडे, प्रा. विलास थोरात उपस्थित होते. या वेळी डॉ. मंदार दातार यांनी बुरशीवर लिहिलेले काव्य, रणदिवे यांनी बुरशीवर लिहिलेला नाट्यप्रवेश सादर करण्यात आला. अमोल काळे यांनी निवेदन केले. डॉ. महेश शिंदीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
घाणेकर म्हणाले, ‘निसर्ग साखळीत महत्त्वाची भूमिका बजविणारी, तरीही दुर्लक्षित बुरशीला या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मराठीत आणण्याचे मोलाचे काम डॉ. रणदिवे यांनी केले आहे. बुरशी आणि दगडफुले (लायकेन्स) हे केवळ निसर्गाचा भाग नसून ते शांततामय सहजीवनाचा मोठा संदेश देतात.’