Tmc Office Attacked By Bjp Rampage At Headquarters
तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
तृणमूल काँग्रेसच्या कोलकात्यातील कॅमक स्ट्रीट येथील कार्यालयाची सशस्त्र हल्लेखोरांनी गुरुवारी पहाटे तोडफोड केली. या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.
अभिषेक बॅनर्जी यांनी या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये कार्यालयातील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तोडफोड झालेली दिसत आहे. याशिवाय मास्क आणि हेल्मेट घातलेले काही लोक टीव्हीसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन बाहेर पडताना दिसत आहेत. हे सशस्त्र हल्लेखोर पहाटे ४.३० वाजता कार्यालयात शिरले. त्यांनी कार्यकर्त्यांवर हल्ला केला, त्यांचे मोबाइल फोन हिसकावले आणि कार्यालयाची नासधूस केली, असा आरोप डायमंड हार्बरचे खासदार असलेल्या अभिषेक यांनी केला. ‘हा कायद्याच्या राज्यावरील लज्जास्पद हल्ला असून, पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांना कायदा किंवा न्यायव्यवस्थेची भीती उरलेली नाही,’ असेही ते म्हणाले.‘भाजप कधीच सूडाचे राजकारण करत नाही या तोडफोडीशी भाजप कार्यकर्त्यांचा काही संबंध नाही’, असे पक्षाचे प्रभारी समिक भट्टाचार्य यांनी नमूद केले.
‘हल्ले असेच सुरू राहिल्यास तृणमूल काँग्रेस पक्ष दिल्लीतील भाजप नेत्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करील,’ अशी प्रतिक्रिया पक्षाच्या प्रमुख, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली.