निवासाचा गोंधळ सुरूच; क्रूझवरही हाल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
chaos in players accommodations on cruise ship japanese athletes face difficulties
नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवासस्थान म्हणून ‘ कोस्टा सेरेना ’ या महाकाय क्रूझ जहाजाचा वापर करण्यात येत आहे; मात्र या मोठ्या व्यवस्थेतील उणिवा आता समोर येऊ लागल्या आहेत. एका लहानशा खोलीत दोन खेळाडूंचीच कशीबशी व्यवस्था असताना भारतीय खेळाडूंना ही खोली तीन खेळाडूंसह शेअर करावी लागत आहे.

उद्घाटन समारंभाच्या अवघ्या दोन दिवस आधी निवास व्यवस्थेबाबत यजमान जपानच्या खेळाडूंनाही अशाच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तांनुसार, काही जपानी खेळाडू पर्यायी निवासस्थानाच्या शोधात आहेत. काही पुरुष आणि महिला खेळाडूंना एकच खोली देण्यात आल्याचे प्रकारही समोर आले असल्याचे वृत्त आहे.
‘असे प्रकार समोर आले आहेत, जिथे प्रशिक्षक, संघाचे अधिकारी आणि खेळाडूंना एकाच खोलीत ठेवण्यात आले आहे. काही प्रकरणांत केवळ संख्येच्या आधारावर खोल्या देण्यात आल्या. कागदावरील संख्येनुसार खोल्यांचे वाटप केले जात आहे; पण यामुळे पुरुष आणि महिलांना एकच खोली मिळत आहे. काही वेळा प्रशिक्षकांना खेळाडूंसह खोली मिळत आहे, तर काही वेळा मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपकरणे असलेल्या ट्रेनरसह खेळाडूंना राहावे लागत आहे. त्यामुळे कठीण परिस्थिती निर्माण होत आहे,’ असे जपानचे उपमिशन प्रमुख हिसाशी मिझुतोरी यांनी सांगितले.

भारताच्या रोइंग, वुशू आणि टेबल टेनिस संघांतील खेळाडूंची निवासव्यवस्था इटालियन क्रूझ जहाजात करण्यात आली आहे. हे जहाज सध्या चर्चेत आहे. या जहाजात १५०० केबिन आहेत.

दोन खेळाडूंसाठींच्या खोल्यांत तीन खेळाडू राहत आहेत. खोल्या लहान असल्याने अतिरिक्त खेळाडूमुळे असुविधा होत आहे; मात्र खेळाडू औपचारिकपणे तक्रार करत नाहीत, असे भारताच्य एका सदस्याने सांगितले.