विक्रमी पाऊस अन् चक्रीवादळ?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
cyclone and record rain worries threat looms over sports events in japan
प्रथम विक्रमी पावसाचा तडाखा बसला. त्यानंतर क्रीडाग्रामाची सोय नसल्याने स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंना निवासव्यवस्थेच्या दुरवस्थेला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांपुढे चक्रीवादळाचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने तसा अंदाज वर्तवला आहे.

आयोजकांनी हजारो खेळाडूंची व्यवस्था येथील बंदरात उभ्या असलेल्या क्रूझ जहाजावर केली आहे; मात्र, चक्रीवादळ ामुळे या जहाजावर आधीच दाटीवाटीने राहणाऱ्या खेळाडूंचे आणखी हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे चक्रीवादळ बंदरावर धडकू नये, अशीच आयोजकांची ‘प्रार्थना’ सुरू आहे. एशियाडसाठी १७ हजारांहून अधिक खेळाडू आणि अधिकारी नागोया व आइची प्रांतात दाखल होत आहेत. खर्च वाचवण्यासाठी यजमान जपानने पारंपरिक क्रीडाग्रामाऐवजी स्पर्धकांची व्यवस्था तात्पुरत्या कंटेनर हाऊसमध्ये, हॉटेल्समध्ये आणि ‘कोस्टा सेरेना’ या क्रूझ जहाजावर केली आहे.
गेल्या आठवड्यात विक्रमी पावसामुळे नागोयातील सखल भागांत पाणी साचले होते. त्या वेळी शहरात दाखल झालेल्या काही खेळाडूंना कंटेनर हाऊसमधून काही काळासाठी इतरत्र हलवावे लागले होते. अनेक संघांनी लहान खोल्यांच्या दर्जाबाबतही तक्रारी केल्या आहेत. काहींनी खाटा अतिशय लहान असल्याची टीका केली, तर काहींनी या स्पर्धेत सर्वांसाठी पुरेशा खोल्या नसल्याचे सांगितले आहे

हवामान खात्याने रविवारी किंवा सोमवारी जपानच्या मुख्य बेटावर, जिथे नागोया वसले आहे, तेथे चक्रीवादळ धडकू शकते, असा अंदाज वर्तवला. याच नागोयाच्या बंदरात उभ्या असलेल्या जहाजावर जवळपास चार हजार स्पर्धक वास्तव्यास आहेत. ‘सध्याच्या घडीला सर्वांत वाईट परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रार्थना करणे एवढेच आपण करू शकतो,’ असे एका क्रीडा महासंघाच्या अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.