तेजल, वृंदाची झुंज; भारत ‘अ’ची हार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
india a team loses to australia a tejal and vrinda clash
न्यू चंडीगड : वृंदा दिनेश आणि तेजल हसबनीस यांनी झुंज दिली. मात्र, अखेर भारत महिला ‘अ’ संघाला ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात सात धावांनी हार पत्करावी लागली. यासह ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया ‘अ’ - ५ बाद १६८ (अनिका लिअरॉयड ६१, कर्टनी वेब ५२, सायली सातघरे २-२५, वैष्णवी शर्मा २-३२) वि. वि. भारत ‘अ’ - सर्व बाद १६१ (वृंदा दिनेश ६९, तेजल हसबनीस ४२, सिमरन बहादूर नाबाद १५, तायला ३-२४, लिली मिल्स ३-४०).

मेस्सीचे ‘शतक’
मायामी : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने इंटर मायामीकडून खेळताना आपला शंभरावा गोल नोंदवला. त्याने आणि कॅसेमिरोने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर मायामी संघाने क्रूझ अझूल संघावर २-० अशी मात केली आणि कॅम्पेवन्स कप उंचावला.

बीसीसीआयची बैठक

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची शुक्रवारी ९५वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. यात अंदमान आणि निकोबार क्रिकेट असोसिएशनला सहयोगी सदस्यत्व देणे आणि आयसीसीमध्ये बीसीसीआयच्या प्रतिनिधीची नियुक्ती हे मुद्दे अजेंड्यावर असणार आहेत. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये कार्यकारिणीच्या दोन प्रतिनिधींचा समावेश करण्याबाबतही विचार केला जाईल.

‘बंगाल’ने संधी दवडली

अम्मान : ईस्ट बंगाल क्लबला ‘एएफसी चॅम्पियन्स लीग टू’मधील ड गटाच्या फुटबॉल लढतीत अल हुसेन क्लबविरुद्ध २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. रामिरेझ आणि अन्वर अली यांनी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर ईस्ट बंगाल संघाने मध्यंतराला २-० अशी आघाडी घेतली होती.

भारत-कोरिया लढत

भारत आणि यजमान दक्षिण कोरिया डेव्हिस कप टेनिस लढतीत (क्वालिफायर राउंड २) आज, शुक्रवारपासून आमनेसामने येत असून, डेव्हिस कप फायनल आठमध्ये ऐतिहासिक स्थान मिळवण्याच्या निर्धाराने भारतीय संघ कोर्टवर उतरणार आहे.