कृत्रिम तलावांकडे गणेशभक्तांची पाठ

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
कृत्रिम तलावांकडे गणेशभक्तांची पाठ
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र गणेशभक्तांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळला नसल्याचे दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. शहरात दीड दिवसांच्या २ हजार ५८५ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले असून, त्यापैकी केवळ ७७५ मूर्तींचे कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यात आले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी यंदा पालिकेने जलप्रदूषण रोखण्यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्तींना प्राधान्य देण्याबरोबरच कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. यासाठी शहरात तब्बल १३ कृत्रिम तलाव उभारले आहेत. दीड दिवसांच्या विसर्जनात १ हजार ९८७ म्हणजेच ७६ टक्क्यांहून अधिक गणेशमूर्ती पीओपीच्याच होत्या. तर शाडू मातीच्या मूर्तींची संख्या ५९८ होत्या. कृत्रिम तलावांत विसर्जित झालेल्या मूर्तींचे प्रमाण सुमारे ३० टक्के इतकेच राहिले.
पुढील काळात पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे आगामी विसर्जनाच्या वेळी गणेशभक्त कृत्रिम तलावांचा कितपत वापर करतात, तसेच पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात होऊ नये यासाठी नगर परिषद कोणत्या उपाययोजना करते, याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेकडून कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र देण्याचेही जाहीर केले होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने हा उपक्रम हाती घेतला होता. मात्र दीड दिवसांच्या विर्सजनाच्या वेळी नागरिकांनी कृत्रिम तलावांकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.