Shiv Sena bjp Conflict Erupts Again In Ulhasnagar As Municipal Disputes Heat Up
उल्हासनगरात पुन्हा शिवसेना-भाजप संघर्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले. महासभेतील चर्चेदरम्यान भाजपचे नगरसेवक प्रधान पाटील यांनी महापौरांच्या वडिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून महापौर अश्विनी निकम संतप्त झाल्या. महापौरांनी त्यांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिल्यानंतरही पाटील यांनी ठिय्या मांडल्याने महासभेत जोरदार गदारोळ झाला.
महापालिकेत बुधवारी पार पडलेल्या महासभेतील चर्चेदरम्यान पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर महापौर निकम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘माझा बाप काढला’ असे म्हणत त्यांनी पाटील यांच्यावर आक्षेप घेतला आणि त्यांना सभागृहातून बाहेर जाण्याचे आदेश दिले. मात्र, पाटील यांनी महापौरांच्या आदेशाला न जुमानता सभागृहातच ठिय्या मांडल्याने परिस्थिती अधिक चिघळली. यानंतर शिवसेना आणि भाजप चे नगरसेवक आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने सभागृहात शाब्दिक चकमकी झडल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर महापौर निकम यांनी पाटील यांच्या निलंबनाचे आदेश महापालिका सचिवांना दिले. या कारवाईनंतर भाजप नगरसेवकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्याने सभागृहातील वातावरण आणखी तणावपूर्ण झाले.महापालिकेत शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र असतानाही दोन्ही पक्षांमधील मतभेद वारंवार समोर येत आहेत. यापूर्वी स्वीकृत सदस्यांच्या निवड प्रक्रियेवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला होता.