The Feats Of Swimmers In Punes Masters Swimming Championship And Complaints About Mismanagement
मनस्ताप; हाल-हाल... तरीही कमाल!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुणे : भीती...दुखापती... खाण्या-पिण्याचे हाल अशा प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी २२व्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत कमाल केली. महाराष्ट्राने या स्पर्धेत सर्वाधिक दोनशेहून अधिक पदके मिळवली. त्यात ६९ सुवर्ण, ९१ रौप्य आणि ६६ ब्राँझपदकांचा समावेश आहे.
हरियाणातील बहादूरगड येथे ही स्पर्धा झाली. बेंगळुरू येथे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या आशियाई मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही राष्ट्रीय स्पर्धा महत्त्वाची होती. मात्र, ही स्पर्धा यातील यशा-अपयशापेक्षा अव्यवस्था, हाल आणि भीतीच्या वातावरणामुळेच जास्त चर्चेत राहिली. या स्पर्धेत सोनेरी यश मिळवूनही ‘त्या’ कटू आठवणी महाराष्ट्राचे जलतरणपटूंच्या मनात घर करून राहिल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी भारतीय जलतरण महासंघाकडे (एसएफआय) तक्रारीही केल्या आहेत.कैफियत...
या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका जलतरणपटूने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की बहादूरगडला झालेल्या स्पर्धा अतिशय वाईट पद्धतीने घेण्यात आली. स्पर्धा स्थळावर जाण्यासाठीचा रस्ता धड तर नव्हताच; पण जलतरण तलावातील पाण्याचा दर्जाही चांगला नव्हता. त्यातच पुरेसे मॅट नसल्यामुळे निसरड्या टाइल्सवर पडून खेळाडूंना दुखापतीही झाल्या. त्यातच तेथे बसण्यासाठी चांगली प्रेक्षक गॅलरीही नव्हती. अशा स्थितीत पावसामुळे खेळाडूंना खूप त्रास झाला. त्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही चांगली व्यवस्था नव्हती. शौचालये अतिशय नित्कृष्ट होती. तीन दिवसांच्या ही स्पर्धा खरेच राष्ट्रीय स्पर्धा आहे का, हा प्रश्नच होता. अनेकदा यापेक्षा जिल्हास्तरावरील स्पर्धा चांगली होते.
भीतीदायक अंधारवाट...
नाव न छापण्याच्या अटीवर एका महिला जलतरपटूने सांगितले, की स्पर्धा मुख्य शहरापासून लांब अंतरावर होती, रस्ता निर्मनुष्य असायचा. त्यातच योग्य नियोजनाअभावी स्पर्धा रात्री उशिरापर्यंत लांबायच्या. पहाटे चारपर्यंत शर्यती चालल्या. रात्रीच्या अंधारात परतण्याचा अनुभव भीतीदायकच असायचा. त्यातच मद्यपी, भटक्या कुत्र्यांची भीती वाटायची. रात्री हॉटेलवर परतताना मद्यधुंद दुचाकीस्वाराने आमचा पाठलाग केला; तसेच हॉटेलपर्यंत सोडतो, असे तो म्हणत होता. माझ्यासोबत पुरुष सहकारी असतानाही त्याने हे धाडस केले. त्यामुळे एकटे परतणे तर शक्यच नव्हते. त्यामुळे इतर सहकाऱ्यांसोबत जाण्यासाठी त्यांचा इव्हेंट संपेपर्यंत आम्ही महिला थांबू लागलो. मात्र, रात्री कितीही उशीर झाला, तरी सकाळी पुन्हा लगेच दुसऱ्या इव्हेंटसाठी पुन्हा तलावावर परतावे लागायचे. साहजिकच आम्हाला पुरेशी विश्रांतीही मिळत नव्हती. स्पर्धेच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नव्हती. उशिरापर्यंत स्पर्धा चालायच्या; मग अशा परिस्थिती जवळ जे काही असेल ते आम्ही खात होतो. पिण्याचे पाणी घाणेरड्या ड्रममध्ये ठेवलेले होते, स्वच्छतागृहातही पाणी नव्हते. त्यामुळे तेथेही दुर्गंधी पसरली होती. ‘चेंजिग रूम’ही चांगल्या नव्हत्या. खेळाडूंची सुरक्षेला महत्त्व द्यायला हवे. आशा आहे, की यापुढे महासंघ अधिक काळजी घेईल.
रात्री एक वाजता बस...
‘स्पर्धा ठिकाणाच्या बाहेरच्या बाजूला दारू पिऊन धिंगाणा घालताना अनेकांनी पाहिले. त्यातच बाहेर पथदिवेही नव्हते. त्यामुळे अनेकांनी संयोजकांकडे तक्रारी केल्या. त्यानंतर त्यांनी बहादूरगड शहरात सोडण्यासाठी रात्री एक वाजता बसची व्यवस्था केली. मात्र, ती बस भरल्याशिवाय सोडणार नाही, असेही सांगितले होते. त्यामुळे इतरांचे इव्हेंट संपेपर्यंत आम्ही थांबून राहायचो,’ असे एका जलतरणपटूने सांगितले.
या प्रकारांबाबत महासंघाचे सरचिटणीस चोक्शी म्हणाले, ‘या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू जास्त वयाचे असतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक काळजी घ्यायला हवी होती, स्पर्धकांच्या तक्रारींची आम्ही दखल घेतली आहे. यापेक्षा नक्कीच चांगली व्यवस्था करण्याची गरज होती. चार वाजेपर्यंत स्पर्धा चाललेल्याच नाही पाहिजेत. मात्र, जोरदार पावसामुळे आणि स्पर्धकांच्या वाढलेल्या संख्येमुळे संयोजकावर ताण आला. ’
‘एसएफआय’ने आपल्या संलग्न राज्य संघटनांना राज्य स्पर्धा घ्यायला लावल्या होत्या. त्यातील विजेता आणि उपविजेता आशियाई मास्टर्स स्पर्धेसाठी पात्र ठरणार होता. त्या परिपत्रकामुळे राज्य संघटनांनी कमी कालावधीत स्पर्धाही घेतल्या. त्यानंतर, तेरा ऑगस्टला महासंघाने आणखी एक परिपत्रक काढले, त्यात त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अनिवार्य केला. त्याच वेळी त्यांनी राज्य स्पर्धा झाली असल्यास, त्यातील विजेत्या-उपविजेत्यांना राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाबाबत सूट दिली होती. मात्र, त्यानंतर २५ ऑगस्टला महासंघाने पुन्हा परिपत्रक काढले आणि ती सूट रद्द केली. त्यामुळे आशियाई मास्टर्स स्पर्धेत खेळण्याची आस घेऊन मोठ्या संख्येने राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेत सहभागी झाले. सातत्याने काढलेल्या परिपत्रकांबाबत भारतीय जलतरण महासंघाचे सरचिटणीस मोनल चोक्शी म्हणाले, ‘या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार असल्याने, जास्तीतजास्त चांगले खेळाडू जावेत, हा आमचा हेतू होता. त्यात बदल करण्यात गैर काही नाही.’