टाकाऊ साहित्याला लाभले गणेशरूप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
unique use of waste material in ganesh festival
रेल्वेच्या बोगींच्या देखभालीत उपयोगी पडणाऱ्या वस्तू कालांतराने टाकाऊ ठरतात. मात्र, याच टाकाऊ साहित्याला कामगारांच्या कल्पकतेची आणि अभियांत्रिकी कौशल्याची जोड मिळाली की त्यातून गणरायाचे रूप साकारू शकते. लोअर परळ येथील पश्चिम रेल्वेच्या कार्यशाळेत याच कल्पनेतून टाकाऊ साहित्याचा गणपती साकारण्यात आला असून, या अनोख्या गणरायाच्या माध्यमातून कामगारांचा उत्साह आणि कौशल्य अधोरेखित होत आहे.

लोअर परळ कार्यशाळेत गेल्या दोन दशकांपासून गणेशोत्सवाची परंपरा आहे. या कार्यशाळेत इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) बनावटीच्या रेल्वे बोगींसह मिल्क टँकर बोगींची देखभाल केली जाते. देखभालीदरम्यान बदलण्यात आलेल्या विविध वस्तूंचा उपयोग करून यंदा गणरायाची मूर्ती तयार करण्यात आली आहे.
गणरायाची मूर्ती साकारताना कॉम्पेन्सेटिंग रिंग, कॉटर पिन्स, व्हॅक्यूम सिलिंडर, अँकर लिंक, मिल्क टँकर लिव्हर्स आणि कॉम्प्रेशन स्प्रिंग्स यांसारख्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. वेगवेगळ्या आकारांच्या या वस्तूंची कल्पकतेने सांगड घालत कामगारांनी त्यांना गणरायाचे रूप दिले आहे. कलेचा अधिपती असलेल्या गणरायाचा उत्सव साजरा करताना कला, अभियांत्रिकी कौशल्य आणि भक्ती यांचा संगम या मूर्तीत पाहायला मिळतो. कार्यशाळेतील कामगारांसाठी हा उत्सव त्यांच्या दैनंदिन कामातील कौशल्याला सर्जनशीलतेची जोड देणारा ठरला आहे.