नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी बुधवारी भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. गेल्या वर्षी ‘ ऑपरेशन सिंदूर ’ मध्ये दक्षिण कमांडचे नेतृत्व करणाऱ्या सेठ यांनी लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांची जागा घेतली आहे. साऊथ ब्लॉकच्या लॉनवर आयोजित एका शानदार सोहळ्यात जनरल सेठ यांना ‘ गार्ड ऑफ ऑनर ’ देण्यात आला. यापूर्वी त्यांनी मंगळवारी दक्षिण कमांडच्या प्रमुखपदाचा त्याग केला होता. पुणे येथील दक्षिण कमांडच्या मुख्यालयातून निरोप घेताना त्यांनी सैनिकांना तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यातील युद्धांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. दरम्यान लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी दक्षिण कमांडच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.
जनगणनेला सुरुवात
नवी दिल्ली : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास बुधवारपासून सुरूवात करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनगणना अर्जात माहिती भरून या मोहिमेस सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात घरांची नोंदणी आणि घरसंख्या भरून घेतली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात जनगणना केली जाणार आहे.
चंडीगडमध्ये स्फोट
चंडीगड : पंजाब भाजप मुख्यालयाबाहेर बुधवारी झालेल्या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सायंकाळी पाचच्या सुमारास हा स्फोट झाला असून, राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक घटनास्थळी दाखल झाल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखर यांनी या घटनेला पक्ष कार्यालयावरील हल्ला असे म्हटले आहे.




