बुलढाणा : देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी येथे घराला आग लागल्यानंतर सिलिंडरचा स्फोट झाला. आग विझविणाऱ्यांसह शेजारी असे सात जण दगड, टीनपत्रे लागून जखमी झाले. १० एप्रिलच्या मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली. दगडवाडी येथील कारभारी दीपाजी नागरे यांच्या घराला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. आग लागताच घरातील लोक बाहेर पडले. तर शेजारील सौंदा उगलमुगले यांनी ग्रामस्थांना आवाज देत उठविले. ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पंधरा ते वीस मिनिटांत अग्निशामक दल पोहोचले. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घरावरील टीनपत्रे व मोठमोठे दगड दूरवर फेकले गेले. टीनपत्रे व दगड लागून आर्यन शंकर घुगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सत्यभामा काशीराम उगलमुगले, चंद्रभागा छगन घुगे, गजानन बाजीराव घुगे, शारदा शिवाजी घुगे, शांता कारभारी घुगे, रंजना संतोष डोईफोडे हे जखमी झाले आहेत. आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.



