गोंदिया : रात्री आठ वाजताच्या सुमारास घराबाहेर उभा असलेल्या सहा वर्षीय बालकावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शुक्रवारी अर्जुनी मोर तालुक्यातील धाबे टेकडी आदर्श येथे घडली. प्रज्वल गोवर्धन मेश्राम असे मृत बालकाचे नाव आहे. सदर बालक रात्री लघुशंकेकरिता घराबाहेर आला असता दबा धरून बसलेल्या वाघाने झडप झालत क्षणार्धात प्रज्वला उचलून जवळच्या जंगलाच्या दिशेने नेले. लगेच घरच्यांनी व गावकऱ्यांनी आरडाओरड करत शोध मोहीम सुरू केली. घरापासून काही अंतरावर प्रज्वल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. मात्र या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
युवकाची हत्या
वर्धा : मोबाइल हिसकल्याच्या किरकोळ वादातून एका युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. प्रवीण योगीराज राऊत (वय २०) रा. बेलगाव असे मृतकाचे नाव आहे. तो गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत शुक्रवारी सेलू पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी सकाळी सेलू येथील विश्रामगृहाच्या मागील भागातील बोर नदीच्या पात्रात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मृतदेह ताब्यात घेतला. तपासादरम्यान मृतदेह प्रवीण राऊत याचाच असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून त्याचा मित्र सूरज रमेश ढगे (वय २०) यास ताब्यात घेतले. चौकशीत मोबाइल हिसकल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे समोर आले.
बुवाबाजी विरोधी परिषद
अकोला : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने अकोल्यातील विविध सामाजिक संघटनांनी शनिवार १८ एप्रिल रोजी ‘बुवाबाजी विरोधी परिषद’ आयोजित केली आहे. दुपारी १ वाजता मराठा मंडळ सभागृहात होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली, प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते होईल. यावेळी विशेष उपस्थित म्हणून प्रा.श्याम मानव, आमदार अमोल मिटकरी, आमदार नितीन देशमुख, मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल उपस्थित राहतील. यावेळी विविध सत्रात डॉ. आशा मिरगे, पुरुषोत्तम आवारे पाटील , शरद वानखडे, अशोक घाटे हे मार्गदर्शन करतील.
दहा टिप्परवर कारवाई
बुलढाणा : लोणार तालुक्यातील खापरखेडा लाड येथील वाळू घाटातून रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणारे दहा टिप्पर जप्त करण्यात आले. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून बीबी पोलिसांनी ही कारवाई केली. आरटीओंनी वजन काट्यावर मोजमाप केले असता क्षमतेपेक्षा जास्त रेती आढळली. या वाहनधारकांना ७ लाख ८६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.




