पाच दशकांनंतर ‘मथुरा’ला अखेर आधार

महाराष्ट्र टाइम्स

देशातील बलात्कार कायद्यात बदल घडवणाऱ्या मथुरा प्रकरणातील पीडितेला अखेर आधार मिळाला आहे. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी पक्षाघाताने त्रस्त असलेल्या या महिलेला घर उभारणी आणि वैद्यकीय गरजांसाठी ही रक्कम दिली जाईल. १९७२ च्या घटनेनंतर कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या होत्या. आता या नायिकेला दिलासा मिळाला आहे.

victim of mathura case finally receives help after five decades

देशातील बलात्कारविषयक कायद्यात निर्णायक बदल घडवून आणणाऱ्या गडचिरोलीतील ‘मथुरा’ प्रकरणातील पीडितेला तब्बल पाच दशकांनंतर दिलासा मिळाला आहे. हलाखीच्या परिस्थितीत आयुष्य जगत असलेल्या या ज्येष्ठ महिलेसाठी लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

वयाच्या ७२व्या वर्षी पक्षाघाताशी सामना करत असताना ही महिला अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस काढत आहे. ज्या लढ्यामुळे देशातील महिलांच्या संरक्षणासाठी कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा घडल्या, त्याच लढ्याची नायिका आज मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे वास्तव पुढे आले आहे. १९७२ मध्ये देसाईगंज येथील पोलिस ठाण्यात घडलेल्या घटनेनंतर ‘मथुरा’ प्रकरण देशभर चर्चेत आले होते. त्यानंतर १९८३ मध्ये फौजदारी कायद्यात दुरुस्त्या करत ‘कोठडीतील बलात्कार’ आणि ‘संमती’ यांसारख्या मुद्द्यांवर कठोर तरतुदी करण्यात आल्या. दरम्यान, या पीडितेची सध्याची परिस्थिती समोर आल्यानंतर लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश गुप्ता यांनी मदतीचा निर्णय घेतला. फाउंडेशनतर्फे देण्यात आलेली रक्कम घर उभारणी आणि वैद्यकीय गरजांसाठी वापरण्यात येणार आहे.