चंद्रपूर : राजुरा तालुक्यात विहिरगाव नाक्याजवळ रेल्वेच्या धडकेत एका अवयस्क मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. राजुरा वनक्षेत्रातील विहिरगाव नियत क्षेत्रामध्ये, दक्षिण मध्य रेल्वेच्या रुळाजवळ सकाळी ८.४० च्या सुमारास सुमारे १८ महिने वयाच्या बिबट्याचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच घटनास्थळी तत्काळ वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एन. पी. तेलंगे यांनी शवविच्छेदन केले असून, अहवालाची प्रतीक्षा आहे. सदर रेल्वेमार्ग वन्यजीवांच्या हालचालींसाठी ओळखल्या जाणाऱ्या कॉरिडॉरचा भाग आहे, येथे अशा अपघाताच्या घटना वारंवार घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांत राजुरा तालुक्यात रेल्वेच्या धडकेत वाघ आणि बिबट्या ठार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.




