‘बोलणे एक आणि वागणे दुसरे अशी तफावत समाजात रुजली आहे. घटनेवर सारेच बोलतात. मात्र, प्रत्यक्ष आचरण घटनेच्या तत्त्वानुसार कोणीच करीत नाहीत. मग आपल्या बोलण्या आणि वागण्यातच तफावत असेल, तर सामाजिक एकता संपली, बंधुभाव संपला हे बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे सांगून साहित्याने समाजमनाला आकार दिला. साहित्यामुळे समाजात प्रगल्भता आली,’ असे विचार संमेलनाध्यक्ष फ. म. शहाजिंदे यांनी सांगतेच्या भाषणात मांडले.
मराठवाडा साहित्य परिषद आणि भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान, शांतिवन आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ४५व्या मराठी साहित्य संमेलनाची शनिवारी सायंकाळी सांगता झाली. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. म. शहाजिंदे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले, प्रा. आसाराम लोमटे, रामचंद्र तिरुके, दीपा क्षीरसागर, रामचंद्र काळुंखे, डॉ. अशोक बेलखोडे, प्रा. गणेश मोहिते, दीपक नागरगोजे, भास्कर बडे, कावेरी नागरगोजे आदी उपस्थित होते.
ठाले पाटील म्हणाले, ‘सामाजिक काम हे विस्तवावरून चालण्यासारखे आहे; कारण समाजाची परिस्थिती खूप विदारक होत आहे. अशा परिस्थितीत मराठवाडा साहित्य संमेलनात भीषण सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारे परिसंवाद ठेवले. संमेलनात अशी चर्चा ठेवणे धाडसाचे असते. हे धाडस साहित्य परिषदेने केले.’




