नाशिकरोड : शहरातील जयराम हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर या प्रख्यात रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या तन्वी नानाभाऊ भदाणे (वय २२) या युवतीने आपल्याच रुग्णालयातील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.११) दुपारी उघडकीस आली. परिचारिकेने आत्महत्या केल्याची घटना समजताच रुग्णालयासह शहरात खळबळ उडाली. मूळची गुंजाळनगर, ता. देवळा येथील असलेली तन्वी भदाणे ही परिचारिका म्हणून जयराम रुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून कार्यरत होती. तिच्यासोबत इतरही परिचारिका कार्यरत होत्या. त्यांच्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णालयाच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आलेली होती. शुक्रवारी तन्वी भदाणे हिने नेहमीप्रमाणे आपली ड्युटी पूर्ण केली होती.




