राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार देण्याचे निश्चित झाल्यानंतर आता या प्रश्नावरून महाविकास आघाडीतील फूट पुन्हा एकदा समोर आली आहे. काँग्रेसने उमेदवार देण्याचे निश्चित केले असतानाच शिवसेना (उबाठा) पक्षाकडून मात्र या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचे निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिणामी महाविकास आघाडीतील बेबनावची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार बारामती आणि राहुरी या दोन मतदार संघांतील पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. त्यासाठी भाजपकडून प्रयत्नही सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढणार आहेत. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी बुलडाणा येथे पत्रकारांशी बोलताना बारामतीत पक्षाकडून उमेदवार उभा केला जाणार असल्याचे सांगितले. अर्थात बारामती येथे उमेदवार द्यायचा किंवा कसे, याचा निर्णय काँग्रेसचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठीच घेणार असल्याचे राज्यातील इतर ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. सपकाळ यांच्या या विधानामागे येऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला विचारल्या- शिवायच शरद पवार यांनी शिवसेनेला उमेदवारी देऊ केल्याच्या विधानामुळे दुखावलेल्या काँग्रेसच्या नेत्यांचा दबाव असल्याचेही बोलले जात आहे. महाविकास आघाडी म्हणून केवळ काँग्रेसनेच कायम त्याग करायचा व शिवसेना, राष्ट्रवादी (शप) यांनी कायम फायदाच घ्यायचा हे योग्य नसल्याचे राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. आयत्यावेळी दिल्लीहून हिरवा कंदील मिळाल्यास उमेदवारीसाठी घाई होऊ नये म्हणून काँग्रेसमधून काही नावांची चाचपणीही केली जात असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाने बारामतीबाबत अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. या संदर्भात पक्षाकडून लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी (शप) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या त्यांच्या निवासस्थानी खलबते सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.