‘लक्षवेधी’ ठरण्याचा भाजपचा प्रयत्न

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

केरळमध्ये भाजप आता लक्षवेधी ठरत आहे. अनेक ठिकाणी भाजपचे झेंडे दिसू लागले आहेत. पंतप्रधान मोदींच्या नावामुळे भाजपची दखल घेतली जात आहे. या निवडणुकीत केरळमध्ये तिरंगी लढतीचा उल्लेख होत आहे. महागाई, बेरोजगारी आणि तरुणांचे स्थलांतर यांसारख्या समस्यांवर भाजप लक्ष केंद्रित करत आहे. केरळ मॉडेलचा फुगा फुटला असून, आता विकसित केरळम् हे भाजपचे मॉडेल असेल असे म्हटले जात आहे.

bjps successful attempt to achieve targeted victory in kerala

(पान १ वरून)

तिरुअनंतपुरम, अल्लपुळा, कोची यांसारख्या शहरांत अनेक ठिकाणी माकप आणि काँग्रेसच्या झेंड्यांबरोबरच भाजपचेही झेंडे आता ठळकपणे दिसतात. भाजपचे केंद्रीय नेते राज्यात प्रचारसभा घेत आहेत. केरळमध्ये बदलाची हाक देत आहेत. त्याबरोबरच स्थानिकांच्या तोंडीही मध्येच पंतप्रधान मोदींचे नाव येत असल्याने या वेळच्या निवडणुकीत भाजपची अधिक दखल घेतली जात असल्याचे चित्र दिसत आहे.

केरळमधून भाजपचा एक खासदार लोकसभेवर निवडून गेलेला असला, तरी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. मात्र, या वेळची निवडणूक ही वेगळी आहे. भाजपने रणनीती आखून किमान काही आमदार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, नेमम, पलक्कडसारख्या काही जागांवर अधिक ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रथमच केरळमध्ये दुरंगीऐवजी तिरंगी लढतीचा उल्लेख होत आहे. ‘केरळसाठी ही सगळ्यांत महत्त्वाची निवडणूक आहे. आजवर पाच वर्षे आलटून-पालटून माकप आणि काँग्रेस सत्तेत होते. मात्र, या काळात केरळला प्रगतीच्या दिशेने नेण्यात या पक्षांना अपयशच आले. आज सर्वाधिक महागाई, बेरोजगारी, तरुणांचे स्थलांतर हे प्रश्न केरळमध्ये आहेत. त्यामुळेच भाजपसाठी केरळमध्ये आता मोठी संधी आहे,’ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर हे तिरुअनंतपुरममधील नेमम मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षे केलेल्या कामामुळे भाजपची दखल घेतली जात आहे. केंद्र सरकारमुळे राज्याच्या विकासाला गती आली आहे. केरळ मॉडेलचा फुगा फुटला असून, ‘विकसित केरळम्’ हे आमचे मॉडेलचे आता दिसेल,’ अशी पुस्ती त्यांनी जोडली.

‘अमली पदार्थांचा विळखा’

‘उच्च शिक्षणासाठी केरळमधील विद्यार्थी राज्यात थांबायला तयार नाहीत. रोजगाराच्या अपुऱ्या संधी हे त्याचे एक कारण आहे. मात्र, केरळमधील अमली पदार्थांच्या विळख्याच्या चिंतेमुळे, हिंसाचाराच्या धास्तीने पालक त्यांना बाहेर पाठवत आहेत,’ असा आरोप चंद्रशेखर यांनी केला.