भोंदूबाबा अशोक खरातप्रमाणेच लैंगिक शोषणाच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या संशयित रवींद्र एरंडे (वय ६२) याच्या गैरकृत्यांची यादी थेट इगतपुरीतल्या लॉजपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. एरंडे याने स्वतःच्या कार्यालयासह इगतपुरीतल्या लॉजमध्ये महिलांसोबत शरीरसंबंध ठेवत गोपनीयरित्या त्याचे व्हिडीओ तयार केले. यासह हस्तरेषा तज्ज्ञ असल्याचा दावा करून एरंडे यानेही कथित ‘भविष्यवाणी’ केल्याचा पोलिसांना संशय आहे.
आक्षेपार्ह व्हिडीओवरून चौघांनी खंडणी उकळल्याचे सांगत स्वतःचे पाप लपविणाऱ्या व्यावसायिक व पत्रकाराचे लैंगिक अत्याचाराचे बिंग अखेरीस त्याच्याच ‘ऑफिस बॉय’ने रचलेल्या सापळ्यामुळे फुटले आहे. सातपूर पोलिसांनी एरंडे याला बलात्कारासह ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक केली असून, सध्या एरंडे पोलिस कोठडीत आहे.
दरम्यान, एरंडेकडील टॅब व हार्डडिस्कमध्ये १२१ अश्लील व्हिडीओ आहेत. त्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू झाली असून, एरंडेने हे व्हिडीओ प्रसारित केले असण्याची किंवा त्याद्वारे पीडित महिलांना ‘ ब्लॅकमेल ’ केल्याचा संशय आहे. त्यानुसार सायबर पोलिसदेखील स्वतंत्र तपास करीत आहेत. तसेच खंडणीच्या गुन्ह्यात एरंडे स्वतः फिर्यादी असून, त्या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली. हे संशयित नऊ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत असून, आज, सोमवारी (दि. ६) एरंडे याला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.



