बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने अखेर रविवारी आपला उमेदवार जाहीर केला. आकाश मोरे हे पक्षाकडून उमेदवार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज, सोमवारी आपला अर्ज दाखल करणार आहेत.
काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी आकाश मोरे यांच्या नावाची घोषणा केली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने ही उमेदवारी जाहीर करत असल्याचे वेणुगोपाल म्हणाले. मोरे हे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सचिवपदावर कार्यरत आहेत. राहुरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याविषयीची घोषणा रविवारी रात्रीपर्यंत झाली नव्हती.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी बारामती मतदारसंघात २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. आज, सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. महायुतीतील घटक पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. परंतु, आत्तापर्यंत १९ जणांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसला उमेदवार न देण्याचे आवाहन (पान ४वर)

