पुणे : पुण्यातील प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्थेचे (डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी - डीआयएटी) धातुशास्त्र आणि पदार्थ विज्ञान विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि अधिष्ठाता (अकॅडेमिक्स) प्रा. बालसुब्रमण्यम के. यांना हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल) आयोजित ‘ नावीन्यपूर्ण कल्पना स्पर्धा २०२५’ मध्ये ‘प्रतिष्ठित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ’ या गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
या स्पर्धेत देशभरातून तब्बल ४९५ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. ‘एचपीसीएल’च्या संशोधन तज्ज्ञांनी बहुपदरी प्रक्रियेद्वारे त्यांचे मूल्यमापन केले. प्रा. बालसुब्रमण्यम यांनी आपल्या पीएचडी संशोधक श्रुती गुप्ता यांच्या सहकार्याने सादर केलेला प्रस्ताव पहिल्या २०० प्रस्तावांमध्ये निवडण्यात आला आणि अंतिम फेरीत सर्वोच्च ठरला. या प्रस्तावामध्ये कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन सल्फाइड या हानिकारक वायूंच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रगत मटेरियल आधारित उपाय सुचविण्यात आले आहेत. विशेषतः शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल उद्योगांमध्ये या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होऊ शकतो. अंतिम फेरीत उद्योग आणि अकादमी क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांच्या समितीने प्रस्तावांचे मूल्यमापन केले. या पुरस्कारामुळे प्रा. बालसुब्रमण्यम यांच्या संशोधनाची गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्रातील उपयुक्तता अधोरेखित झाली आहे.
पुरस्कार वितरण समारंभ नुकताच पार पडला. ‘डीआयएटी’चे कुलगुरू डॉ. बी. एच. व्ही. एस. नारायण मूर्ती यांनी प्रा. बालसुब्रमण्यम आणि श्रुती गुप्ता यांचे अभिनंदन केले.



