हायड्रोपोनिक गांजा विमानतळावर जप्त

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून ९६० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. हा गांजा मातीशिवाय पिकवला जातो आणि त्याची किंमत ३३ लाख ६० हजार रुपये आहे. या प्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विमानतळ पुन्हा एकदा तस्करांच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे.

ganja smuggled from bangkok seized at pune airport

हा गांजा मातीविना केवळ पाणी आणि पोषक घटकांच्या साह्याने नियंत्रित वातावरणात पिकवला जातो. याला ‘ड्रो’ असेही म्हणतात. सर्वसामान्य गांजाच्या तुलनेत हा अधिक उच्च दर्जाचा, प्रभावी आणि महागडा असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात याला मोठी मागणी असते.

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या ‘ एअर इंटेलिजन्स युनिट ’ने धाडसी कारवाई करून बँकॉकहून पुण्यात उतरलेल्या प्रवाशाकडून ९६० ग्रॅम ‘हायड्रोपोनिक’ गांजा (मारिजुआना) जप्त केला. कार्बन पेपरमध्ये गुंडाळून गांजाची तस्करी करणाऱ्या या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात या गांजाची किंमत ३३ लाख ६० हजार रुपये आहे. या घटनेमुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ अमली पदार्थ तस्करांच्या निशाण्यावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

पुणे सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसचे ‘आयएक्स-२४१’ हे विमान बँकॉकहून पुणे विमानतळावर उतरले. या विमानातील एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ‘एअर इंटेलिजन्स युनिट’च्या अधिकाऱ्यांनी त्याची कसून तपासणी केली. या प्रवाशाने तपासणी टाळण्यासाठी अत्यंत चतुराईने गांजाचे दोन पारदर्शक व्हॅक्युम-सीलबंद पॅकेट्स आपल्या हँडबॅगमध्ये लपविले होते. स्कॅनरच्या नजरेतून वाचण्यासाठी त्याने हे अमली पदार्थ कार्बन पेपरमध्ये गुंडाळून ठेवले होते. मात्र, सतर्क अधिकाऱ्यांपुढे त्याची शक्कल अपयशी ठरली. या प्रवाशाला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.