जहाज ‘होर्मुझ’पार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय एलपीजी जहाजाने यशस्वी प्रवास केला आहे. इराणहून आलेले आणखी एक जहाज मंगळुरू बंदरात पोहोचले आहे. प्रादेशिक अस्थिरता असूनही इंधन पुरवठा सुरळीत आहे. देशात पेट्रोलियम उत्पादने आणि स्वयंपाकाच्या गॅसचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकार सक्रीय पावले उचलत आहे. नागरिकांनी घाबरून खरेदी करू नये.

जहाज ‘होर्मुझ’पार

एलपीजी घेऊन येणाऱ्या भारतीय जहाजाने युद्धग्रस्त होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरीत्या पार केली आहे. या जहाजात अर्ध्या दिवसाचा स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा होऊ शकेल, इतके इंधन आहे. तर इराणहून आलेले आणखी एक जहाज मंगळुरू बंदरात पोहोचले आहे. प्रादेशिक अस्थिरता असतानाही इंधन पुरवठा सुरळीत असल्याचे हे संकेत असल्याचे सांगितले जात आहे.

‘एलपीजी जहाज ‘ग्रीन सानवी’ हे होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे बाहेर पडले आहे. या जहाजावर २५ नाविक असून, ४६,६५० टन एलपीजीचा साठा आहे,’ अशी माहिती पश्चिम आशियातील घडामोडींबाबत माहिती देणाऱ्या सरकारी निवेदनात शनिवारी देण्यात आली. ‘ग्रीन सानवी’ हे या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या जलमार्गातून प्रवास करणारे, भारतीय ध्वज असलेले सातवे एलपीजी जहाज आहे. ‘सुमारे ४४,००० टन इराणी एलपीजी वाहून नेणारे ‘सी बर्ड’ हे जहाज २ एप्रिल रोजी मंगळुरू बंदरात दाखल झाले असून सध्या त्यातून माल उतरवला जात आहे,’ असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. अजूनही १७ भारतीय जहाजे सामुद्रधुनीच्या पश्चिमेकडे अडकली आहेत.

सरकारची पुन्हा ग्वाही

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची घाबरून खरेदी करू नका, असे आवाहन सरकारने शनिवारी नागरिकांना केले. सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांनंतरही इंधनाचा पुरवठा पुरेसा आहे. स्थिती नियंत्रणात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘देशात पेट्रोलियम उत्पादने आणि स्वयंपाकाच्या गॅसचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सक्रीय पावले उचलली जात आहेत,’ असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले. तसेच, नागरिकांना केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आणि ऊर्जेचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अणु प्रकल्पाजवळ हल्ला

कैरो : इराणच्या बुशेहर अणु प्रकल्पाजवळ हवाई हल्ला करण्यात आला. यामध्ये सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला असून एका इमारतीचे नुकसान झाले. युद्धादरम्यान या प्रकल्पाला लक्ष्य करण्याची ही चौथी वेळ आहे, अशी माहिती इराणच्या अणुऊर्जा संस्थेने दिली.