बारामती : बारामती मतदारसंघातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी शनिवारी बाधित भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी समजून घेतल्या.
जय पवार म्हणाले, ‘नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सध्या सुरू असून, ते लवकर पूर्ण करण्यात येतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.’ या वेळी त्यांनी बारामतीबाबत भावना व्यक्त करताना ‘अजित पवार यांनी बारामतीकडे नेहमी कुटुंब म्हणून पाहिले आहे आणि आम्हीही त्याच भावनेने काम करीत आहोत,’ असे सांगितले. ‘ही निवडणूक अपेक्षित नव्हती. मात्र, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा घटनात्मक अधिकार आहे आणि आम्ही त्या प्रक्रियेचा आदर करतो,’ अशा शब्दांत त्यांनी पोटनिवडणुकीबाबत भाष्य केले.



