इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पेट्रोलच्या दरात ८० पाकिस्तानी रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांना पेट्रोल प्रति लिटर ३७८ पाकिस्तानी रुपयांना उपलब्ध होईल.
संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) घेतलेल्या साडेतीन अर्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड पाकिस्तान करणार आहे. या महिन्यात तीन टप्प्यांत ही रक्कम परत केली जाणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या परकी चलनाची गंगाजळी खालावण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने एप्रिल महिन्यात टप्प्याटप्प्याने या कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या आठवड्यात सुमारे ४५० दशलक्ष डॉलर दिले जातील. त्यानंतर दोन अब्ज डॉलर आणि महिन्याच्या उत्तरार्धात आणखी एक अब्ज डॉलर दिले जातील, असे वृत्त ‘दी एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने दिले आहे. पूर्वी आखाती देश पाकिस्तानला परतफेडीसाठी अनेकदा मुदतवाढ देत. यूएई मात्र पाकिस्तानला अल्प मुदतवाढ देत होते. सध्या ती देण्यात आलेली नाही.




