शहर शिवसेनेत अस्वस्थता

महाराष्ट्र टाइम्स

शिवसेनेने शहर कार्यकारिणी बरखास्त केली आहे. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्रचना होईपर्यंत प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रभारी ठेवण्यात आले आहे. कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. अनेक कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. पक्ष कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन बदल करेल अशी अपेक्षा आहे.

tension in shiv sena decision taken by eknath shinde

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आढाव्यानंतरच हा निर्णय घेतला आहे. पुनर्रचना होईपर्यंत कारभार पाहण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रभारी स्वरूपात कायम ठेवले आहे. निवडणुकीनंतरची ही नियमित प्रक्रिया आहे. पक्षात कोणीही अस्वस्थ नाही. कोणी ठाण्याला जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची कल्पना नसल्याचे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेच्या निवडणुकीत १२० जागा लढूनही एकही उमेदवार निवडून न आल्याने शिवसेनेने शहर कार्यकारिणी बरखास्त केली आहे. एक महिन्याच्या आत कार्यकारिणीची पुनर्रचना केली जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. ही पुनर्रचना नेमकी कशी केली जाणार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये बदल होणार की नाही, असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.

महापालिका निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर शिवसेनेने शहर पातळीवर मोठे संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरप्रमुख व शहरप्रमुख यांच्या अखत्यारितील सर्व पदे तात्पुरती गोठवण्यात आली असून, नव्या रचनेची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. पक्षाची एकही जागा निवडून येऊ शकली नाही, यात कार्यकर्त्यांचा दोष नाही. सर्वांनी प्रयत्न केले होते. मात्र, आता कार्यकर्त्यांनाच शिक्षा दिली जात आहे. निर्णय घेण्याची जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही. त्यांनाही जबाबदार धरले जावे आणि त्यांच्या जागी इतरांना संधी द्यावी,अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. त्यासाठी बहुसंख्य कार्यकर्ते रविवारी ठाण्याला जाऊन पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे समजते.

निवडणुकीनंतर विशेषत: पराभवानंतर पक्षाने आत्मचिंतन करणे, पुनर्रचना करणे आवश्यक आहेच. मात्र, त्यासाठी कार्यकर्त्यांनाही विश्वासात घेतले पाहिजे. कार्यकारिणी बरखास्त करताना वरची तीन पदे कायम का ठेवली? प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये परस्पर संवाद राहिला, उत्तम समनव्य राहिला, तरच पक्ष नव्या जोमाने काम करेल, असा दावा काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.