थापा मारून दांड्या मारणे इतके महागात पडेल, असे पोलिसाला स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र वारंवार वैद्यकीय कारणे पुढे करून, डॉक्टर, रुग्णालयाची प्रमाणपत्रे देऊन गैरहजर राहणाऱ्या पोलिसाविरुद्ध पोलिसांनाच एखाद्या गुन्ह्यासारखा तपास करावा लागला. हा तपास मुंबईवरून नाशिकपर्यंत पोहोचला. रुग्णालयात सेवा देत नसलेल्या डॉक्टरांच्या नावाने आणि बनावट सहीने वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या पोलिसाला अद्दल घडावी, यासाठी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गैरहजर राहणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल होण्याची बहुदा ही पहिलीच घटना असावी.
जोगेश्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मूळव्याधीचे कारण आणि आरामाची आवश्यकता असल्याचा डॉक्टरांचा अहवाल आणि नाशिक येथील एका खासगी रुग्णालयाने केलेल्या उपचारांची कागदपत्रे सादर करून एका पोलिस कॉन्स्टेबलने दोन टप्प्यांत तब्बल ४९ दिवसांची रजा घेतली. त्याने सादर केलेल्या कागदपत्रांबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिस ठाण्यातून ते खरेच आजारी आहेत का, नाशिकच्या रुग्णालयात दाखल होते का, याची चौकशी सुरू करण्यात आली. पोलिस ठाण्याकडून या रुग्णालयाकडून अहवाल मागवण्यात आला. तेव्हा या कॉन्स्टेबलने ४९ दिवसांत आंतररुग्ण किंवा बाह्यरुग्ण म्हणून उपचार घेतलेले नाहीत. मात्र नोंदवहीत पहिल्या टप्प्यात त्यांचे नाव आंतररुग्ण म्हणून दिसते, असा अहवाल दिला.
एकाच नावाची दोन रुग्णालये असल्याने काहीतरी घोळ झाला असावा म्हणून पोलिस आणखी खोलात गेले. दोन्ही रुग्णालयांत जाऊन चौकशी केली. या रुग्णालयात उपचार देणाऱ्या एका डॉक्टरच्या स्वाक्षरीने तीन वैद्यकीय अहवाल पोलिसाने सादर केले होते. त्यांतील दोन अहवालांत आरामाची आणि सक्तीच्या आरामाचा सल्ला तर, तिसऱ्या अहवालात कर्तव्य बजावण्यास पात्र, असे नमूद होते. संबंधित डॉक्टरकडे चौकशी करण्यात आली तेव्हा अहवालातील सही बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस हे तपासाकरिता आल्याने आणि बदनामी झाल्यामुळे रुग्णालयानेच या पोलिसाविरुद्ध जोगेश्वरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून या दांडीबहाद्दर कॉन्स्टेबलविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.




