महाराष्ट्र दिनी नव्या योजनेचे पाणी

महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र दिनी शहरात पाणी पुरवठा सुरू होण्यावर उच्च न्यायालयाने भर दिला आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी एमबीआरमध्ये आणून गुरुत्वाकर्षणाने शहरात वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधल्यास एक मे रोजी पाणी येईल असा विश्वास न्यायालयाने व्यक्त केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार आहे. शहरवासीयांचे लक्ष याकडे लागले आहे.

water supply system via water purification center on maharashtra day

महाराष्ट्र दिनाच्या आधी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी एमबीआरमध्ये (संतुलित जलकुंभ) घेण्यात यावे व तेथून ते गुरुत्वाकर्षणाने शहरात वितरित व्हावे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास एक मे रोजी (महाराष्ट्र दिनी) शहरात नक्कीच पाणी येईल असा विश्वास उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. अभय मंत्री यांनी व्यक्त केला.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीची बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक एप्रिल २०२६ रोजी पार पडली. या बैठकीचे इतिवृत्त शासकीय अभिवक्ता अमरजितसिंग गिरासे यांनी उच्च न्यायालयात सादर केला.

सुनावणीच्यावेळी ॲड. आर.एन. बोर्डे यांनी बाजू मांडताना सांगितले की, जॅकवेल ते जलशुध्दीकरण केंद्र या ३८ किलोमीटर अंतरापैकी ३६ किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण झाली आहे. ढोरकीन येथे स्क्रोल व्हॉल्व्ह फुटल्यामुळे दोन दिवस काम थांबले होते, तो बदलून तातडीने पंपिंग सुरू करण्यात येईल.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे वकील ॲड. संभाजी टोपे यांनी उच्च न्यायालयाला माहिती दिली.

ते म्हणाले, आयुक्त अमोल येडगे यांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. जॅकवेल ते एमबीआरपर्यंतच्या सर्व तांत्रिक बाबींचा आढावा त्यांनी घेतला.

कंत्राटदाराकडून अपेक्षित व करारातील वीस कामे शिल्लक असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वकील ॲड. राजेंद्र देशमुख यांनी सांगितले.

यानंतर उच्च न्यायालयाने निर्देश दिले की, महाराष्ट्र दिनाच्या आधी जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी एमबीआरमध्ये घेण्यात यावे आणि तिथून ते गुरुत्वाकर्षण वाहिनीव्दारे शहरात वितरित व्हावे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास १ मे रोजी शहरात नक्कीच पाणी येईल.

न्यायालयाचे मित्र ॲड. शंभुराजे देशमुख यांच्यावतीने ॲड. रामराजे देशमुख यांनी बाजू मांडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार असून २३ एप्रिल रोजी समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, या सुनावणीकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.