निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल सोनम वांगचुक यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. सन १९९९च्या कारगिल युद्धातील शौर्याबद्दल त्यांना ‘महावीर चक्र’ प्रदान करण्यात आले होते.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ‘लडाखचा सुपुत्र’ म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव करून ‘‘ ऑपरेशन विजय ’च्या वेळी त्यांच्या शौर्याने जवानांना उंच पर्वतीय प्रदेशातील खडतर परिस्थितीत लढण्याची प्रेरणा दिली होती,’ अशा शब्दांत आदरांजली वाहिली आहे. शौर्य, खंबीर नेतृत्व आणि कर्तव्याप्रति असलेल्या अढळ निष्ठेसाठी ते लष्करात ओळखले जात होते, असेही संरक्षणमंत्री सिंह यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भारतीय लष्करानेही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, या दुःखद प्रसंगी लष्कर त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले आहे. लष्कराकडून या संबंधी एक पोस्ट करण्यात आली असून, त्यात त्यांनी ‘ऑपरेशन विजय’दरम्यान दाखवलेल्या शौर्यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.



