हेल्मेटसक्तीबाबत राज्यभरात सर्वदूर उदासीनता

Contributed byदीपेश मोरेdipesh.more@timesofidia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यात हेल्मेटसक्तीकडे दुर्लक्ष होत आहे. मुंबई आणि नागपूर वगळता इतर शहरांमध्ये दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. यामुळे अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. पोलिस महासंचालकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. आता सर्वत्र कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनाही नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.

indifference of the state in enforcing helmet usage rules

 मुुंबई : दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती असतानाही राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई आणि नागपूर ही दोन शहरे वगळता इतर शहरे आणि जिल्ह्यांमध्ये हेल्मेटसक्तीबाबत उदासीनता असून, पोलिस प्रभावी कारवाई करताना दिसत नसल्याचे वास्तव आहे. हेल्मेट न घातल्याने अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यभरात कडक कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी जारी केले आहेत.

दाते यांनी नुकतीच नागपूर पोलिस आयुक्तालयात एक बैठक घेतली. यामध्ये महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांत झालेल्या अपघातांची आकडेवारी ठेवण्यात आली. या आकडेवारीमध्ये अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणि गंभीर दुखापत झालेल्यांमध्ये ३५ ते ४० टक्के अपघात दुचाकीस्वारांचे असल्याचे दिसून आले. हेल्मेट न वापरल्याने अपघातामध्ये मृत्यू किंवा गंभीर दुखापतीची शक्यता असते. तरीदेखील मुंबई व नागपूर व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अन्य सर्व शहरे आणि जिल्ह्यांत हेल्मेट वापरले जात नाही. या दोन शहरांत हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक असून, अन्य सर्व शहरे व जिल्ह्यांत ही संख्या २० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले. पोलिसांकडूनही तितकीच प्रभावी कारवाई केली जात नसल्याचेही यातून स्पष्ट झाले.

अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी राज्यातील सर्व पोलिसांना हेल्मेटसक्तीबाबत कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सर्व पोलिसांनीदेखील कायद्याचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.