अदनान कापडिया हा छत्रपती संभाजीनगर शहरातील पेडलर्सच्या संपर्कात असून त्याने पूर्वी मेडिकल स्टोअर्समध्ये काम केल्याचे समोर येत आहे. तर धीरुभाई लाठिया हा मेडीसीन डिस्ट्रीब्युशन एजन्सी कागदोपत्री चालवत असून प्रत्यक्षात तो सुरत येथील एजंट ना अवैधपणे पुरवठा करत असे तसेच त्याच्याकडे रॉयल मेडीकेअर, रवी मेडीकेअर अशा नावाने लायसन्स असून त्याचे ऑफिसमध्ये विविध एजन्सीच्या नावाचे शिक्के, औषधी खरेदी विक्रीच्या पावत्या इत्यादी कागदपत्रे आढळून आले असून ते जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले.
शहरात गुंगीकारक औषधाचा बेकायदा पुरवठा करणाऱ्या दोन आरोपींना अंमली पदार्थ विरोधी कृती दलाने जेरबंद केले. अदनान कपाडिया (वय २९) व धीरुभाई लाठिया (वय ६०, दोघेही रा. सुरत, गुजरात) अशी त्यांची नावे असून पथकाने सुरतमध्ये या दोघांच्या मुसक्या आवळल्या.
छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २१ मार्च रोजी दलाने मोठी कारवाई करीत ९ लाख ३९ हजार रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. या कारवाईत गुंगीकारक अशा दोन हजार औषधाच्या गोळ्या तसेच सिरपच्या ११८ बाटल्यांचा समावेश होता. हा साठा ट्रॅव्हल्स बसद्वारे सुरतहून शहरात आणला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नगर नाका परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
प्राथमिक तपासात हा साठा शहरात अवैध विक्रीसाठी आणला जात असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तपासाची दिशा पुरवठा साखळीच्या मूळापर्यंत नेण्यात आली. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थांचा पुरवठा थेट गुजरातमधून होत असल्याचे उघड झाले. या आधारे टास्क फोर्सच्या पथकाने सुरत येथे जाऊन कपाडिया व लाठिया यांना ताब्यात घेतले.
यातील अदनान हा छावणी, बेगमपुरा तसेच सातारा पोलिस ठाण्यात दाखल तीन गुन्ह्यात पोलिसांना हवा होता. तर धीरुभाई हा अदनान यास अवैैधपणे औषधाचा साठा पुरवत असल्याचेही समोर येत आहे. ही कारवाई पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलिस उप महानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील, पोलिस अधिक्षक अजित टिके, पोलिस उप अधिक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जगदाळे, पोलिस हवालदार रवींद्र साळवे, अतुल तुपे, राहुल काळे, सूरज जोनवाल, ज्योती कीर्तीकर यांनी केली.




