नागपूर : एअर होस्टेसच्या आत्महत्येप्रकरणी लकडगंज पोलिसांनी डॉक्टरला अटक केली. रिकेश राजकुमार वांदिले (वय २८, रा. उमरेड) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे. गायत्री (वय २८) असे मृताचे नाव असून, ती एका विमान कंपनीत कार्यरत होती. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गायत्रीच्या वडिलांचे हॉटेल आहे. तिचे रितेशसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करणार होते. याबाबत त्यांनी नातेवाइकांना सांगितले. नातेवाइकांनाही त्यांच्या लग्नाला होकार दिला. ३ एप्रिलला तिचे नातेवाईक भंडाऱ्यातील नातेवाइकाकडे असलेल्या कार्यक्रमासाठी गेले. यादरम्यान गायत्रीने रिकेशच्या मोबाइलवर संपर्क साधला. बोलताना दोघांमध्ये वाद झाला. गायत्रीने आत्महत्येची धमकी देत मोबाइल बंद केला. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय भंडाऱ्याहून परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान रिकेशने वाद वाढवून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले.



