‘बदलत्या काळात शेतीचे झपाट्याने यांत्रिकीकरण होत आहे. त्यामुळे आधी शेतीचा कणा मानल्या जाणाऱ्या बैलांचा शेतकामांमध्ये कमी प्रमाणात वापर होऊन महत्त्व कमी होते आहे’, असे मत केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री सत्यपाल सिंग बघेल यांनी शनिवारी व्यक्त केले.
ॲग्रिव्हिजन, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडिया आणि विद्यानिधी यांच्यावतीने पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशुवैद्यकीय, दुग्ध व मत्स्य विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बघेल बोलत होते. व्यासपीठावर माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संयुक्त संघटन सचिव देवदत्त जोशी, भारतीय पशुवैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. उमेश चंद्र शर्मा, राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. के. बेहेरा, विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. शिरीष उपाध्ये, ॲग्रिव्हिजनचे राष्ट्रीय संयोजक मनीष फाटे व आयोजन संयोजक शिवम दुबे उपस्थितीत होते.
बघेल म्हणाले, ‘आपल्या देशात दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी आणि उच्च जातीच्या पशुधनाची निर्मिती करण्यासाठी सरकार आयव्हीएफ तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे जनावरांमध्ये नरांची संख्या कमी झाली आहे. पाचएक दशकाआधी वासरू जन्माला आल्यावर गूळ-खोबरे वाटले जायचे. आता तसे राहिले नाही. आपला देश दूध उत्पादनात जगात सर्वात पुढे असावा, हाच त्यामागचा शासनाचा उद्देश आहे’.
सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन शिवम पांडे यांनी केले.
सध्या देशात ठराविक ठिकाणी आयव्हीएफ केंद्रे सुरू आहेत. मात्र, हे तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्याच्या गोठ्यापर्यंत पोहोचवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. जेव्हा आपल्या देशातही शंभर टक्के यशस्वी गर्भधारणेचे लक्ष्य साध्य होईल, तेव्हाच श्वेतक्रांती खऱ्या अर्थाने यशस्वी होईल, असा विश्वासही सत्यपाल सिंग बघेल यांनी व्यक्त केला.



