‘राज्यात संघटनात्मक बदल’

महाराष्ट्र टाइम्स

काँग्रेस पक्ष राज्यात मोठे संघटनात्मक बदल करत आहे. 'संघटन सृजन' अभियानाद्वारे साडेसात हजार नवीन पदाधिकारी नियुक्त केले जातील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना प्रशिक्षण दिले जात आहे. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. खासदार नारायण राणे यांच्यावरही टीका करण्यात आली.

congress party initiates major organizational change in the state

‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात हा घातपात असल्याचा आम्हाला संशय आहे. तशी भूमिकाही सातत्याने मांडत आहोत. या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी आहे. आमची मागणी कर्नाटकतील काँग्रेसने मान्य केली. एवढेच नव्हे, तर त्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर तो महाराष्ट्राकडे वर्ग करण्यात आला. मात्र, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे काहीच करायला आणि बोलायलाही तयार नाहीत. अजित पवारांचा संपूर्ण पक्ष सत्तेत सहभागी असल्याने तेही काही बोलत नाही, हे राज्याचे दुर्भाग्य आहे,’ असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

‘काँग्रेस पक्ष राज्यात मोठे संघटनात्मक बदल करीत आहे. ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत जवळपास साडेसात हजार नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे,’ अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी दिली.

काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, गटनेते ॲड. रामचंद्र उर्फ चंदू कदम, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, किशोर कान्हेरे, माजी सनदी अधिकारी भा. ई. नगराळे आदी उपस्थित होते. ‘‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. याअंतर्गत पक्षाने नेमलेले प्रतिनिधी पुण्यात येऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. यात शहराध्यक्षपदाबाबतही चर्चा होईल. सर्वांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल,’ असे सपकाळ म्हणाले.

‘कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच बारामती पोटनिवडणुकीमधून काँग्रेसने माघार घेतली असली, तरी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा आम्ही निषेध करतो,’ असे सपकाळ म्हणाले.

‘मुख्यमंत्रिपद वगळता काँग्रेसने राणे यांना सर्व काही दिले. शिवसेनेपेक्षा अधिक काळ सत्ता उपभोगण्याची संधी काँग्रेसने त्यांना दिली. वारकरी परंपरा ही पुरोगामी विचारांची आहे आणि मनुवादाच्या विरोधात उभी आहे. मात्र, सध्या काही जण या परंपरेच्या आडून प्रतिगामी विचार मांडत आहेत,’ असा आरोप त्यांनी खासदार नारायण राणे यांच्याबाबत बोलताना केला.